नकाराच्या आधारे समृध्द परंपरा निर्माण होत नाही – डॉ. शरणकुमार लिंबाळे 

पुणे : सरस्वती सन्मान मिळाल्यानंतर झालेला हा पहिला सत्कार आहे. तो स्वीकारताना मी भारावून गेलो आहे. माझ्या आयुष्यात माझा इतका हृद्य सत्कार कधीही झाला नव्हता.  काही दलित लेखकांनी सरस्वतीचे नाव पुढे करून पुरस्कार नाकारण्याची मोहीम सुरु केली आहे. केवळ नकाराच्या आधारे कुठलीही समृद्ध परंपरा निर्माण करता येत नाही असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने भारतीय साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान  सनातन या कादंबरीला जाहीर झाल्याबद्दल  डॉ. शरणकुमार लिंबाळे आणि कादंबरीचे प्रकाशक दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे  यांचा माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, पत्रिका संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस उपस्थित होते. रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घालून तसेच समारंभात पुष्पवृष्टी करुन हा सत्कार करण्यात आला.

लिंबाळे म्हणाले, ‘आपण लोकशाही समाजात राहतो.  हा समाज मिश्र स्वरूपाचा आहे. अनेक जाती, धर्म, परंपरा, प्रथा आणि भाषेने भारतीय समाज विणला गेला आहे. ही वीण खूप स्फोटक आणि संवेदनाक्षम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. दलितांनी दलितेतरांच्या श्रद्धा दुखावू नयेत आणि दलितेतरानी दलितांच्या श्रध्दा दुखावू नयेत. सार्वजनिक जीवनात सामंजस्य आणि सौजन्य महत्त्वाचे ठरते. सतत नकाराच्या भूमिकेमुळे आंबेडकरी समाजात टोकदार कट्टरतावाद वाढीस लागण्याचा धोका आहे. कट्टरतावाद लोकशाहीला मारक असतो. सर्वांनी मिळून समतेने जगण्याची गरज आहे. यातूनच समाज बदलणार आहे.’

मी सरस्वती सन्मान  नाकारला असता, तर पुढल्या काळात दलित लेखकांना काही देतांना दहा वेळा विचार करावा लागला असता. मला असे होऊ द्यायचे नव्हते. मला मिळालेला ‘सरस्वती सन्मान’ दलित लेखक म्हणून मिळाला नाही. हा मराठी भाषेला मिळालेला सन्मान मी मराठी लेखक म्हणून स्वीकारला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. देशाने राज्यघटना स्वीकारली आहे याचाच अर्थ आंबेडकरांना स्वीकारले आहे. आंबेडकरी समाजानेही भारतीय समाजातील सहजीवन जगताना उदार मनाने विविधतेचा स्वीकार केला पाहिजे. ही अपेक्षा बुद्धिवाद्यांकडून करायची नाहीतर कुणाकडून करायची? 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘सगळी प्रादेशिक आणि भाषिक वैशिष्ट्ये जपत लिंबाळे यांनी अनुभवांची मांडणी त्यांच्या साहित्यात आजवर केली. ते साहित्यातून जे मांडताहेत त्याला या पुरस्काराच्या  रूपाने मान्यता मिळाली आहे. ‘सनातन’ या कादंबरीत काळाचा आणि अनुभवाचा विशाल पट आहे. संस्कृतीची मुळे त्यांनी या कादंबरीत गदागदा हलवली आहेत. भूतकाळाचे धागे तोडून भविष्याचां वेध घेताना त्यांनी परिवर्तनाच्या विचाराशी कधीही तडजोड केली नाही. ‘सनातन’ ही कादंबरी विषमतेच्या विषाणू वरची लस आहे.

प्रा. जोशी म्हणाले, कोणतीही टोकाची भूमिका समाजाला कडेलोटाकडेच नेणारी असते. ज्या विचारवंतांनी समाजाला दिशा दाखवायची तेच अविवेकाची कास धरून सुसंवाद आणि समन्वयाच्या वाटा बंद करून वैचारिक झुंडशाहीत सामील होणार असतील तर मग समाजाने कोणाकडे आशेने बघायचे.  लिंबाळे यांनी विद्रोहाचे रूपांतर कधीही विद्वेषlत होऊ दिले नाही. लिंबाळे यांना सरस्वती सन्मान जाहीर झाल्यामुळे मराठी साहित्य विश्वाचाच गौरव देशपातळीवर झाला आहे. तत्वनिष्ठ भूमिकेतून लिंबाळे यांनी आजवर व्रतस्थ वृत्तीने केलेल्या लेखनाचा हा यथोचित गौरव आहे. मराठी साहित्य प्रेमीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: