मैथिली प्रमोद आडकर आणि संदिप बर्वे यांना रमाई रत्न पुरस्कार जाहीर
पुणेः- महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 86 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारे रमाई रत्न पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आडकर फाैंऊंडेशनच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या मैथिली प्रमोद आडकर आणि सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध व्याख्याते संदिप बर्वे यांना यंदाच्या रमाई रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, पंचशील शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे निमंत्रक विठ्ठल गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे. बुधवार दिनांक 26 मे 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते घरगुती छोटेखानी कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे. पुणे शहर जिल्हा काॅंग्रेस कमीटिचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लता राजगुरु कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर उपस्थित राहणार आहेत, असेही निमंत्रक विठ्ठल गायकवाड यांनी कळविले आहे.
