ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील (लक्ष्मण) यांचे नागपूर येथे निधन
नागपूर – ख्यातनाम संगीतकार जोडी राम – लक्ष्मण यांच्या मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. ते आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे.
सुरेन्द्र हेंदरे उपाख्य राम आणि विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. 1976 मध्ये आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.
राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी किर्ती मिळवली, विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल 92 चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी सुपरहिट गाणी दिली.
