देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या निधीचा अपहार; कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे – कोरोना काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी पाठविलेला निधी दुसऱ्या महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करून सात ते आठ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बॅंक खात्याचा संबंधीत पदाधिकाऱ्यांनी गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी नायब तहसीलदार प्रकाश सिद्धेश्वर व्हटकर (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. गौरी तेजबहादूर गुरूंग (वय 32, रा.धनकवडी), सविता अशोक लष्करे (वय 26 ), सारिका अशोक लष्करे (वय 30, दोघीही रा. येरवडा, अमोल दत्तात्रय माळी (वय 25, रा. बालाजीनगर), महेश राजु घडशींग (वय 26, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबरोबरच कायाकल्प संस्थेचे इतर सभासद व सोनवणे यांच्याविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते 26 एप्रिल 2021 दरम्यान पर्वती येथील लक्ष्मीनगर परिसरात घडला. 52 हून अधिक महिलांच्या बॅंक खात्यावर पैसे घेण्यात आले होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने देहविक्रय करणाऱ्या महिलांची कोरोना काळामध्ये उपासमार होऊ नये, म्हणून राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने देहविक्रय करणाऱ्या महिलांचे कोणत्याही स्वरुपाचे ओळखपत्र न घेता त्यांना अनुदान वाटप करण्याचे
वाटप करण्याचे आदेश दिले होते. पुण्यातील या महिलांची यादी बनविण्याचे काम कायाकल्प या संस्थेला देण्यात आले होते. दरम्यान, संबंधीत संस्थेचे पदाधिकारी गौरी गुरूंग, सविता लष्करे, इतर तसेच सोनवणे नावाची व्यक्ती यांनी कट केला. त्यांनी गोरगरीब, निराधार, धूणीभांडी करणाऱ्या कष्टकरी महिलांना कोरोना काळात काम मिळत नसल्याने तीन महिन्यांकरीता 5 हजार रुपये संस्थेकडून देण्यात येतील, अशी त्यांना बतावणी केली. त्यानंतर त्यांची बॅंक खाती शासनाकडे सादर करून संबंधीत बॅंक खात्यावर 23 एप्रिलला प्रत्येकी 15 हजार रुपये जमा झाले. जमा झालेल्या 15 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये संबंधीत महिलांकडून परत घेतले.
