Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

कार्यकारण भाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते- शास्त्रज्ञ डॉ.सत्यजीत रथ

पुणे, दि. १२:  कोरोना या साथीच्या काळात लोकांच्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण होते आणि वैज्ञानिकांकडून त्या कुतुहलांचे निराकरण करताना लोक आणि वैज्ञानिक यांच्या आकलनातील तफावतीमुळे काही प्रामाणिक गैरसमज निर्माण होतात, अशा प्रामाणिक गैरसमजातून जे विज्ञान निर्माण होते ते आंधळे विज्ञान. हे गैरसमज हळू हळू दृढ होत जातात आणि हितसंबंधी लोकांकडून वापरले जाऊ तेव्हा कार्यकारण भाव तपासून न घेतलेल्या या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते. हे कोविड काळात घडताना दिसत आहे,असे मत शास्त्रज्ञ डॉ.सत्यजीत रथ यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” च्या “छद्मविज्ञान विरोधी विशेषांकाचे” प्रकाशन आयसर या संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ असलेले डॉ.सत्यजीत रथ यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्या प्रसंगी “फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ” या विषयावर डॉ. रथ यांनी मार्गदर्शन केले. 

 ते म्हणाले, छद्म विज्ञानातील अनेक कल्पना सर्वसामान्य लोकांनी साथीमुळे उद्भवणाऱ्या भीतीपासून आपल्याला काहीतरी संरक्षण मिळावे, आधार मिळावा यासाठी स्विकारलेल्या दिसतात. कारण त्यात काहीतरी तार्किक वाटणारे समाधान मिळते व या साथीसारख्या भयंकारी काळात अशा स्वरूपाच्या छद्मविज्ञानी कल्पना लोकांच्या पचनी पडू लागतात आणि त्याचा फायदा हितसंबंधी लोक घेतात. समाजात छद्म विज्ञान हे काही फक्त वैद्यकीय शास्त्रातच आहे असे नव्हे ते विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या सर्व शाखांमध्ये सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे कोविडचा विषाणू हा मोठा वैयक्तिक धोका नसून पुरेशा वैद्यकीय सुविधा नसलेल्या समाजात तो सामाजिक धोका ठरत आहे. त्यामुळेच वैद्यकीय सुविधांअभावी रूग्ण मोठ्या प्रमाणावर मरत आहेत ही बाब समाजासाठी लांच्छनास्पद आहे, असे विचार शास्त्रज्ञ डॉ सत्यजीत रथ यांनी व्यक्त केले.

विज्ञानाचे नाव वापरणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल चटकन अविश्वास दाखवू नका तसेच पटकन विश्वासही ठेवू नका पुरावा मागा, तपासा, त्यांची शास्त्रीय कसोटीवर पारख करा” असा सल्ला डॉ. सत्यजित रथ यांनी देत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रतिकार शक्ति, लस, आयुर्वेदिक उपचार या संदर्भातील अनेक प्रश्नांना व्याख्यानानंतर समर्पक उत्तरे दिली.

च्या सुरुवातीला फसवे विज्ञान विरोधी जनजागर अभियानाची माहिती आणि डॉ. सत्यजित रथ यांचा परिचय मुक्ता दाभोलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे साजेसे सुत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध भागातून ५०० च्यावर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक ऑनलाईन ऊपस्थीत होते. या सर्व उपस्थितांचे आभार राहुल थोरात यांनी मानले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading