लसीकरण केंद्रात नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबवा – संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे, दि. ११ – सर्व पुणेकर जनतेला ‘लस’ देण्याचे काम पुणे मनपा, जि.प. करत आहे. नाव नोंदणीसाठी सरकारने ‘अॕप्लीकेशन’ सुध्दा तयार केले आहे, त्यावर नोंदणी होतेच. पुणे मनपाकडे जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा वापर करून जमेल त्या पद्धतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. म्हणून पुणे, महाराष्ट्र अव्वल आले. मात्र प्रत्येक लसीकरण केंद्रावर नगरसेवकांकडून हस्तक्षेप केला जात आहे. नगरसेवकांच्या स्वतःच्या बॅनरबाजीमुळे महामारीत सुद्धा गलिच्छ राजकारण केलं जात आहे. नगरसेवकांच्या दबावामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना लसीकरण केले जाते. इतर नागरिकांना वेळेत लसीकरण होत नाही. तसेच सर्व यंत्रणा महानगरपालिकेची असतांना नगरपालिका नगरसेवकांची लुडबूड कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे… नगरसेवकाची लुडबूड तात्काळ थांबवली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
नगरसेवकांचे कार्यकर्ते लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. त्याच पद्धतीने नगरसेवकांच्या संगनमताने प्रत्येक ठिकाणी लसीचा काळाबाजार सुरू आहे. महाराष्ट्र सरकार व पुणे महानगरपालिका नागरिकांना वारंवार लसीकरण करण्यासाठी आवाहन करत असताना सुद्धा जर नगरसेवक स्वतःच्या कार्यकर्त्यांना साठीच केंद्रबिंदू म्हणून वापरला जात आहे हे पुणेकरांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे महानगर पालिकेने विशेष लक्ष घालून नगरसेवकांचा लसीकरण केंद्रावर चालू असलेला हस्तक्षेप थांबवावा अन्यथा… आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
पुण्यात लस, इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड… वाढत्या महामारी मुळे मिळत नाहीत. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लस सर्वांना सहज पद्धतीने मिळाली पाहिजे. इंजेक्शनचा काळाबाजार पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून हे लोक देशद्रोही आहेत. त्यामुळे इंजेक्शनचा गैर कारभार करणाऱ्या लोंकावर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल केला पाहिजे असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
