बेरोजगारीला कंटाळून पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाची आत्महत्या
पुणे – कामधंदा मिळत नसल्यामुळे एका तरुणाने अवध्या एक वर्षाच्या मुलावर चाकू फिरवून खून केला. त्यानंतर बायकोला गळा दाबून मारून स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) आणि मुलगा शिवजेत (वय एक वर्षे , दोन महिने) या दोघांचा खून केल्यानंतर हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याने आत्महत्या केली आहे. याबाबत दर्याप्पा अर्जुन शिंदे (रा.बक्षिहिपरगा, ता. दक्षिण सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे कुटुंबीय कदमवाक वस्तीवर रहायला होते. हनुमंत हा सिमेंटचे टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिवणकाम करत होती. हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने गेल्या आठ दिवसापासून तो घरी होता. त्यामुळे कंटाळून त्याने रविवारी सकाळी पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःच्या एका वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा कापून खून केला. स्वतः बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून मागील काही दिवसांपासून ते लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर राहत होते. मात्र बेरोजगारी निर्माण झाल्याने हनुमंत यांनी संपूर्ण कुटुंब संपवून टाकले आहे.
याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. पण, दुर्दैवी घटना घडलीच.
घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली . या घटनेमागे आणखी काही कारण आहे का ? याचाही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितले, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
