fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरातर्फे ५०० देवदासी महिलांसाठी ‘अन्नदान सेवेला’ प्रारंभ

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनचा मोठा फटका बुधवार पेठेतील देहविक्री करणा-या महिला, देवदासी व तृतीयपंथीयांना बसला आहे. त्यांना दोन वेळचे जेवण मिळवायला मोठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातर्फे दररोज ५०० महिलांना रात्रीचे विनामूल्य भोजन देण्याच्या सेवेला प्रारंभ झाला. 
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टसह लोहिया परिवार संचलित श्री मुकुंद भवन ट्रस्ट, माहेश्वरी समाज श्री राम मंदिर ट्रस्ट रविवार पेठ यांच्यातर्फे अन्नदान व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) डॉ.संजय शिंदे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते महिलांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. 


यावेळी श्री मुकुंद भवन ट्रस्ट, माहेश्वरी समाज श्री राम मंदिर ट्रस्टचे आदित्य लोहिया, शरद सारडा, सत्येंद्र राठी, चंदन मुंदडा यांसह लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


डॉ.संजय शिंदे म्हणाले, देवदासी भगिनींसाठी दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मध्यवस्तीत सुरु केलेला अन्नदानाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लॉकडाऊनमुळे महिलांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यास यामुळे मदत होणार आहे. मात्र, हे उपक्रम राबविताना सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घ्यावी. 
सुनिल रुकारी म्हणाले, बुधवार पेठेमध्ये देवदासी भगिनींची संख्या मोठी आहे. त्यांना लॉकडाऊनच्या काळात भोजन देण्याकरीता हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज वस्तीमध्ये जाऊन ५०० महिला व मुलांना भोजनाची पाकिटे देण्यात येणार आहेत. तसेच तृतीयपथीयांना देखील या उपक्रमाद्वारे भोजन देण्यात येईल. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी भोजन सहाय्य योजना राबविण्यात आली होती. यंदा या महिलांसाठी उपक्रम राबवित आहोत. गरजेनुसार टप्याटप्याने भोजन पाकिटांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading