पुणेकरांच्या मदतीसाठी पुन्हा सरसावले क्रेडाई पुणे मेट्रो
पुणे, दि. २३ -: कोविडच्या सध्याच्या आव्हानात्मक काळात क्रेडाई पुणे मेट्रो पुन्हा एकदा पुणेकरांच्या मदतीसाठी सरसावले आहे. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी देखील पुणेकरांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला असून संघटनेच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांना १० व्हेंटिलेटर व १० हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस यांची मदत करण्यात आली आहे.
आज बाणेर येथील महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयाला ५ व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस सुपूर्त करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे सहसचिव तेजराज पाटील, पुणे महानगरपालिकेचे डॉ. घुगे या वेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथील महानगरपालिका कोविड रुग्णालयाला देखील ५ व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस देण्यात आले आहेत.
याशिवाय पिंपरी मधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात खास पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या ३० खाटांच्या कक्षाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील आदी या वेळी उपस्थितीत होते. या कक्षासाठी क्रेडाई पुणे मेट्रो ५ व्हेंटिलेटर देणार असल्याची माहिती अनिल फरांदे यांनी दिली आहे.
मागील वर्षीच्या टाळेबंदीदरम्यान क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. ज्यामध्ये शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन खाटांसोबत डिफ्रिब्रिलेटर, सक्शन मशीन व ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. याबरोबरच १ मे पासून क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण मोहीम सुद्धा राबविण्यात येणार असून याचा फायदा अंदाजे १.५ लाख बांधकाम कामगारांना होणार असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी सांगितले.