Saturday, September 5, 2026
PUNE

वृद्ध कलावंतांच्या मदतीसाठी सरसावले आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे हरहुन्नरी शिलेदार

पुणे : वृद्ध कलावंतांना मानधन देण्याचे शासनाने आश्वासन देऊन त्याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही केलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत वृद्ध कलावंतांना दोन वेळच्या अन्नासाठी अक्षरश: जीवाचे रान करावे लागत आहे. वृद्ध कलावंतांची ही समस्या दूर करण्यासाठी पुण्यातील कलावंतांनीच पुढाकार घेतला आहे. फुल नाही पण फुलाची पाकळी या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.

पुण्यातील हे कलावंत आहेत आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे हरहुन्नरी शिलेदार. आम्ही एकपात्री महाराष्ट्र ही संस्था बुधवारी (दि. 21 एप्रिल ) दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचे औचित्य साधून विख्यात गायक कै. छोटा गंधर्व यांच्या कन्या आणि ज्येष्ठ गायिका सुलभा सौदागर गोरे यांना आज आर्थिक मदत देण्यात आली. आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे संस्थापक विश्वस्त वंदन राम नगरकर, अध्यक्ष मारुती यादव, उपाध्यक्षा अनुपमा खरे, सदस्य बाळकृष्ण नेहरकर आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुलभा गोरे यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.

या वेळी बोलताना सुलभा गोरे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत शासन दरबारी, प्रसिद्ध कलाकारांसमोर समस्या मांडूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. कुणीही मदतीचा हात दिला नाही. मीच नव्हे तर माझ्या सारखे अनेक कलावंत मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. आम्ही एकपात्री महाराष्ट्रच्या कलाकारांनी मदतीचा हात देऊन मोठे सहकार्य केले आहे. सुलभा गोरे यांनी कार्यक्रमाचा समारोप संगीत देवमाणूस या नाटकातील एक पद सादर करून केला.
सुनील महाजन म्हणाले, तीस-चाळीस वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक कलावंत, कार्यकर्त्यांचा सहवास लाभला. या कालावधीत अनेक कलावंतांनी आपल्याकडे अनेक अडचणी मांडल्या. त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. कलाकारांनीच कलाकारांना मदतीचा हात देणे हा उपक्रम स्तुत्य आहे. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने कलाकारांसाठी ठोस पावले उचलण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वंदन राम नगरकर प्रास्ताविकात म्हणाले, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी वृद्ध आणि गरजू कलाकारांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. संस्थेमार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भविष्यात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अनेक विधायक उपक्रम करण्याचा मानस आहे.
मारुती यादव यांनी संस्थेचा हा उपक्रम सध्याच्या कठीण काळात मनोरंजानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले. अनुपमा खरे आणि बाळकृष्ण नेहरकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वंदन राम नगरकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading