fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

आयएमसी तर्फे सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ‘रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी माईलस्टोन अवार्ड’ने सन्मानित

पुणे : मुंबई येथील इंडियन मर्चंट चेंबरतर्फे (आयएमसी) दिला जाणारा मनाचा ‘रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी माईलस्टोन अवार्ड’ने वैश्विक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले. ‘आयएमसी-रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट’कडून ‘कस्टमर फोकस’ प्रवर्गात ‘सूर्यदत्ता’ने हा पुरस्कार पटकावला. शुक्रवारी झालेल्या एका ऑनलाईन सोहळ्यात सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांना या पुरस्काराचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते, तर आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पोदार आणि आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्टचे चेअरमन नीरज बजाज आदी उपस्थित होते.


हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन केले व आभार मानले. आजवर मिळालेल्या सर्व पुरस्कारांपैकी हा अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सूर्यदत्ता’सह अन्य सात शिक्षणसंस्था आणि पाच कॉर्पोरेट कंपन्यांना या पुरस्काराने विविध प्रवर्गातुन सन्मानित करण्यात आले. त्यात अहमदाबाद येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कुल, तर उद्योगामधून रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मॅरिको लिमिटेड आदींचा समावेश आहे.
‘आयएमसी-रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट’ ही मुंबईतील नामवंत आणि परफॉर्मन्स एक्सलन्स मॉडेल समजून घेत त्याचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था आहे. हा पुरस्कार म्हणजे संस्थांना आपल्या प्रगतीचा आलेख प्रदर्शित करण्याची संधी असते. लीडरशिप, कस्टमर फोकस, वर्कफोर्स फोकस, ऑपरेशन्स फोकस आणि सुरक्षा या पाच प्रवर्गात हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. आयएमसी ट्रस्टच्या वतीने परीक्षकांचे पॅनल आलेल्या अर्जाची छाननी आणि सर्व पातळ्यांवर गुणवत्ता तपासून नामांकन निवडते.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातत्याने गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल असे सर्वांगीण विकासाचे शिक्षण उपलब्ध करून देत आहे. पाठ्यक्रमासह विद्यार्थ्यांना अवांतर उपक्रमातून, मूल्यवर्धित अभ्यासक्रमातून सर्वांगाने घडविण्याचा प्रयत्न येथे केला जातो. जागतिक स्तरावरील अनेक नामवंत संस्था, विद्यापीठे यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. सूर्यदत्ता ग्रुपच्या सर्व संस्था आयएसओ ९००१-२०१५ एनव्हीटी-क्युसी-यूएसए प्रमाणित आहेत.”

“विद्यार्थी कौशल्याभिमुख, रोजगारक्षम, उद्यमशील, स्वावलंबी आणि देशाचा जबाबदार नागरिक बनावा, यासाठी मेहनत घेतली जाते. गेल्या वीस वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संस्थेचे सल्लागार यांचे मार्गदर्शन व पाठिंबा मोलाचा आहे. सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सर्व सन्मानीय नियोक्ते (रिक्रूटर) आणि सहयोगी सदस्य यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेच्या प्रगतीचा रथ वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी, तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्तेला मर्यादा नसतात, त्यामुळे आपण सतत अद्ययावत राहत आपली गुणवत्ता वाढवत राहिले पाहिजे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading