Saturday, June 13, 2026
Sports

‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाकडून जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून दखल

पुणे, दि. १६ – पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून ब्लेड्स ऑफ ग्लोरीची आता सलग तिस-यांदा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील मानचिन्ह व मानपत्र नुकतेच संग्रहालयाला प्राप्त झाले असल्याची माहिती संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांनी कळविली आहे.

याआधी अमेरिकेतील मिआमी येथील ‘वर्ल्ड रेकॉर्ड अकादमी’ यांनी देखील संग्रहालयाला विश्वविक्रमाने पुरस्कृत केले आहे. इतकेच नव्हे तर आता पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाने आपल्याकडील संग्रहित वस्तूंच्या बळावर लंडनचे लॉर्डस क्रिकेट संग्रहालय, ऑस्ट्रेलियातील द ब्रॅडमॅन संग्रहालय, ग्रेनाडामधील वेस्ट इंडीज क्रिकेट हेरीटेज सेंटर, न्यूझीलंड क्रिकेट संग्रहालय अशा बऱ्याच संग्रहालायांना मागे टाकले आहे.

२०१२ मध्ये भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते पुण्यातील सहकारनगर भागात असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन झाले असून या संग्रहालयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळाडूंच्या ५१ हजारहून अधिक संस्मरणीय क्रिकेट वस्तूंचे संकलन आहे. तब्बल पाच हजार चौरस फुट इतक्या भव्य गॅलरीमध्ये आपल्याला क्रिकेटशी संबंधित वस्तू पाहता येतात. याबरोबरच येथील भव्य गॅलरीमध्ये अनेक बॅट्स व बॉल्स आहेत ज्यावर त्या त्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघांच्या कप्तानांची स्वाक्षरी आहे. शिवाय सर डोनाल्ड ब्रॅडमॅन, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, डेसमंड हेन्स, सर विव्हियन रिचर्डस, इम्रान खान, सुनील गावस्कर अशा अनेक खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य आहे. विश्वचषक सामने विजेत्या संघाच्या व टी २० विश्व सामन्यांच्या प्रत्येक खेळाडूची स्वाक्षरी असलेल्या वस्तू देखील या संग्रहालयात आहेत. पुण्यातील या संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील आजवर किमान ५०० खेळाडूंनी भेटी दिल्या असून अनेक नामवंत खेळाडूंच्या दुर्मिळ क्रिकेट साहित्याचे येथे संकलन आहे.

याविषयी बोलताना रोहन पाटे म्हणाले की, “जागतिक क्रिकेटचा वारसा जपण्याच्या  माझ्या या प्रयत्नांना देश विदेशातील सर्व प्रमुख क्रिकेट खेळाडूंचा पाठींबा लाभला. त्याबरोबरच आता राष्टीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची मोठ्या प्रमाणात दाखल घेतली जात आहे हे बघून आनंद होतो आहे. या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाला येत्या काळात आणखी समृद्ध करण्याचा प्रामाणिक मी यापुढेही जरात राहीन“. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading