अंशुमन विचारे च्या ‘नौटंकी’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न…
प्रत्येक कलाकार हा त्याच्या नावीन्यपूर्ण कलेने नावाजला जातो किंवा ओळखला जातो. कलाकाराचं कामचं असतं प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, त्यांना हसवणे. पण कधी विचार केला आहे का या कलाकाराचे देखील दोन चेहरे असू शकतात. अशाच कलाकारांच्या दोन चेहऱ्यांची जाणीव करून देणारा त्यांची व्यथा मांडणारा साज इंटरटेनमेंट आणि दिव्यांग बायो ऑरगॅनिक प्रस्तुत ‘नौटंकी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचा मुहूर्त चित्रपटातील आयटम साँग रेकॉर्ड करून संपन्न झाला आहे.
प्रत्येक कलाकार हा दोन चेहरे घेऊन समाजामध्ये वावरत असतो. त्याचा एक चेहरा हा नेहमी समाजासमोर असतो आणि एक चेहरा हा त्याच्या आत असतो. तो जसा खऱ्या आयुष्यात आहे तसा पडद्यावर कधीच नसतो. कधी कधी तो समोरच्याला दाखवतो की मी खूप सुखी आहे पण आतल्या आत तो कुठे तरी दु:खी असतो , तो ते कधीच दाखवून देत नाही. अशाच कलाकारांची व्यथा मांडणारा असा हा ‘नौटंकी’ सिनेमा आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अखिल देसाई आहेत आणि चित्रपटाचे सह निर्माते अनिल बच्छाव आणि सुनील बच्छाव हे आहेत. या चित्रपटात दोन गाणी असणार आहेत आणि चित्रपटाचे संगीत भारत सिंह यांनी केले आहे.
‘कॉमेडी जॉनर’ असणार्या “नौटंकी’ या चित्रपटात उत्तम अभिनेता आणि विनोदवीर हास्यसम्राट अंशुमन विचारे हा मुख्य भूमिकेत असणार आहे. सोबतच 3 इडियट, शिष्यवृत्ती यांसारख्या सिनेमांमध्ये अव्वल भूमिका साकारलेला दुष्यंत वाघ देखील या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अद्विका सुमन ही नवी नायिका सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
