परदेशी विद्यापीठांसोबतच्या स्पर्धेत टिकून राहण्याचे बळ मिळावे- कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भरभराट व प्रगती व्हावी. तसेच विद्यार्थ्यांची उन्नती होण्यासोबतच त्यांना उत्तमोत्तम अभ्यासक्रम मिळवून देणे. परदेशी विद्यापीठांसोबत जी स्पर्धा आहे, त्यात टिकून राहणे व पुढे जाणे. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनविणे, याकरीता तसे अभ्यासक्रम देखील तयार व्हावेत, याकरीता बळ मिळावे, अशी प्रार्थना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांनी श्री दत्तमहाराजांच्या चरणी केली.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आॅनलाईन पद्धतीने श्री दत्तभक्तांची माहिती संकलित करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच डॉ.नितीन करमाळकर व त्यांच्या पत्नी रोहिणी करमाळकर यांच्या हस्ते दत्तयाग झाला.
सकाळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते ब्रह्मध्वज पूजन म्हणजेच गुढी उभारण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.
डॉ.नितीन करमाळकर म्हणाले, कोरोनाची महामारी भारतभर आहे, त्यापासून सर्वांना मुक्ती मिळू देतो. सर्वांना चांगले आरोग्य व आयुष्य लाभू देत तसेच भारतवासियांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना दत्तचरणी करीत आहे. ट्रस्टने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून याद्वारे रक्तगटाची यादी देखील तयार होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्याचा फायदा नक्कीच होईल.
डॉ.पराग काळकर म्हणाले, श्री दत्तमहाराजांच्या भक्तांची माहिती गुगल फॉर्मद्वारे भरुन घेण्याच्या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. उमेश सकपाळ याने पहिला फॉर्म भरुन उपक्रमाला प्रारंभ झाला. यामुळे भाविकांची माहिती, रक्तगट आदी माहिती संकलित होणार आहे. भविष्यात कोठेही रक्ताची गरज भासल्यास किंवा अन्य मदत लागल्यास या माहितीचा उपयोग करुन घेता येईल. तरी दत्तभक्तांची आपापली माहिती नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
