Saturday, May 30, 2026
PUNE

रंगभूषाकार निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न असणे आवश्यक
माधव वझे यांचे प्रतिपादन

पुणे : रंभूषाकार हा सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी आणि स्वच्छतेचा भोक्ता असणे फार आवश्यक असते. संवेदनाक्षम रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या ठायी हे सर्व गुण आहेतच, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक माधव वझे यांनी केले.

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे उद्या (दि. 15) वयाची 75 वर्षे पूर्ण करून 76व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त संवाद पुणेतर्फे आज (दि. 14) भावे यांचा वझे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, भावे यांच्या पत्नी सुहासिनी भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भावे यांच्या पुण्यातील उमेदीच्या काळातील आठवणींना उजाळा देत वझे म्हणाले, प्रभाकर भावे यांनी रंगभूषाकार म्हणून नाट्यसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंगभूषा करताना रंगभूषाकाराला कलाकारांच्या अगदी समीप रहावे लागतेे, स्पर्श करणेही अनिवार्य असते, अशा वेळी कलाकाराच्या मनात रंगभूषाकाराविषयी खात्री-विश्वास असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रभाकर भावे यांच्या सत्शील वर्तणुकीमुळे सर्व कलाकारांना त्यांच्याविषयी आदर व विश्वास वाटत आला आहे. प्रभाकर भावे हे त्यांच्या हातातील जादूई कलेने, स्वत:च्या कर्तृत्वाने वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. ‘रंगभूषा’ या भावे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले आहे. त्या वेळच्या आठवणींनाही वझे यांनी उजाळा दिला.

सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी वाट निर्माण करणार्‍या संवाद पुणेच्या उपक्रमांचे कौतुक करताना वझे म्हणाले, सुप्रसिद्ध कलाकारांचा नेहमीच मान-सन्मान केला जातो, पण सुनील महाजन हे प्रसिद्धीपासून दूर असणार्‍या गुणी कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत.
प्रभाकर भावे यांचे मनोगत त्यांच्या पत्नी सुहासिनी भावे यांनी वाचून दाखविले. कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. मी रंगभूषाकार म्हणून घडताना मला वडिलांचे तसेच अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले. राजाभाऊ नातूंमुळे मला रंगभूषाकार म्हणून ओळख मिळाली. आकाशाला गवसणी घालणारी अनेक माणसे मला गुरुस्थानी लाभली हे मी माझे भाग्य समजतो. कुटुंबातील सदस्यांनी या क्षेत्रातील वाटचालीत वेळोवेळी प्रोत्साहन दिले असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, करोनाच्या काळात अनेक कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संवाद पुणेच्या माध्यमातून वृद्ध, गरजू कलाकारांना तसेच पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देत आहोेत.
सन्मानपत्राचे लेखन युवा कवी वलय मुळगुंद यांनी केले आहे. तर त्याचे वाचन मुक्ता पाध्ये यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading