Saturday, May 30, 2026
BusinessPUNE

बांधकाम मजुरांनी घाबरून जाऊ नये, क्रेडाई पुणे मेट्रो घेणार मजुरांची जबाबदारी – अनिल फरांदे

पुणे, दि. १३ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत राज्यातील निर्बंध कडक केले असताना बांधकाम मजुरांनी घाबरून जाऊ नये. क्रेडाई पुणे मेट्रो व संस्थेच्या सभासदांच्या वतीने मजुरांना धान्य, औषधे, वैद्यकीय सुविधेबरोबरच कोविडसाठी लागणा-या आयसोलेशन सुविधा, राहण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी सेवा पुरविण्यात येतील अशी, माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी कळविली आहे.

राज्यातील १२ लाख परवानाधारक बांधकाम मजुरांना राज्य सरकार देत असलेल्या रु. १५०० या आर्थिक मदतीचे देखील क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने स्वागत करण्यात आले. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांच्या लेबर कॅम्पसाठी परवानगी असल्याने या निर्बंधाचा बांधकाम क्षेत्रावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही अशी आम्ही आशा करतो, असेही फरांदे यांनी नमूद केले.

मात्र, असे असले तरी काम नसल्याने व आरोग्याच्या भीतीने अनेक परराज्यातील बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परत जाण्याच्या विचारात असतील, मात्र त्यांचीही काळजी घेण्यात येईल असे आश्वासन देखील क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आले आहे.

मागील वर्षीच्या अनुभवांची शिदोरी पाठीशी असताना आता बांधकाम मजुरांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो कटिबद्ध असून आरोग्य तपासणी बरोबरच आता कामगारांच्या लसीकरणावर देखील भर देण्यात येईल. लवकरच क्रेडाई पुणे मेट्रो हे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या मदतीने बांधकाम मजूर व साईड स्टाफसाठी लसीकरण मोहीम हाती घेईल, अशीही माहिती अनिल फरांदे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading