क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीने १४०० कोटी रुपयांच्या आयपीओचे कागदपत्र दाखल केले.

पुणे – स्पेशालिटी केमिकल उत्पादक कंपनी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीने १४०० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठी आवश्यक प्राथमिक कागदपत्र भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे दाखल केले आहेत.

रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस मसुद्यानुसार हा आयपीओ संपूर्णपणे वर्तमान प्रमोटर्स आणि इतर समभागधारकांकडून ओएफएस अर्थात विक्रीसाठी प्रस्ताव स्वरूपाचा असणार आहे.

ओएफएसमध्ये विक्रीसाठी समभाग प्रस्तुत करणाऱ्यांमध्ये अनंतरूप फायनान्शियल अड्वायजरी सर्व्हिसेस, अशोक रामनारायण बूब, कृष्णकुमार रामनारायण बूब, सिद्धार्थ अशोक सिकची आणि पार्थ अशोक महेश्वरी यांचा समावेश आहे.

क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कंपनी परफॉर्मन्स केमिकल्स फार्मास्युटिकल इंटर्मीडिएट्स आणि एफएमसीजी केमिकल्स यासारख्या विशेष उद्योगांमध्ये, विशेष उपयोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या केमिकल्सचे उत्पादन करते.

ग्राहक कंपन्या आपापली उत्पादने बनवण्यासाठी महत्त्वाचे प्राथमिक साहित्य म्हणून, इनहिबिटर्स किंवा ऍडिटिव्ह्ज म्हणून या कंपनीच्या उत्पादनांचा वापर करतात.

महत्त्वाच्या स्पेशालिटी केमिकल उत्पादनांच्या बाजारपेठेत सुस्थापित आणि मजबूत स्थान, वैविध्यपूर्ण ग्राहक वर्ग यासाठी ही कंपनी नावाजली जाते.  जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादन उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करत असल्यामुळे या कंपनीच्या कामकाजावर कोविड-१९ महामारीचा प्रभाव देखील मर्यादित स्वरूपाचा आहे.

ही कंपनी पुण्यात असून त्यांच्या ग्राहकांमध्ये भारताबरोबरीनेच चीन, युरोप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तैवान, कोरिया आणि जपान अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील उत्पादक व वितरकांचा समावेश आहे.

कंपनीच्या एकूण महसुलामध्ये दोन-तृतीयांश हिस्सा निर्यातीचा आहे.

ऍक्सिस कॅपिटल, जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल यांना या आयपीओचे मर्चंट बँकर्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.  या कंपनीचे इक्विटी समभाग हे एनएसई व बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्यात येतील.    

Leave a Reply

%d bloggers like this: