Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुख यांना CBI चे समन्स, बुधवारी होणार चौकशी

मुंबई – १०० कोटी भ्रष्टाचारप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं समन्स बजावलं आहे. त्यांना १४ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या चौकशीत काय बाहेर येतंय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेंवर मुंबईतील बार आणि हॉटेल्सचालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा उल्लेख परमबीर यांनी आपल्या पत्रात केला होता. या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडले. तसेच, या प्रकरणी सीबीआयने चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार, आता सीबीआयने १४ एप्रिल रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही रविवारी जबाब नोंदवण्यात आलेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची सुमारे चार तास चौकशी केली, त्यानंतर त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडून आता अनिल देशमुख यांनाही समन्स पाठवण्यात आला असून, त्यांनाही चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांच्या वतीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) 31 मार्चला युक्तिवाद झाला होता.

परमबीर सिंग यांच्या वतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली होती. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आणखी तीन याचिकांवरही सुनावणी झाली होती. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली होती. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात होता. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading