Saturday, May 30, 2026
MAHARASHTRA

‘स्वदेशीच लस कशाला हवी? माणूस जगला पाहिजे’, छगन भुजबळ केंद्र सरकारवर बरसले

नाशिक – राज्यात लसींचा आणि रेमडेसीव्हिरचा साठा यावरून तुफान राजकारण सुरू आहे. एकीकडे केंद्र सरकार लस पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय, तर दुसरीकडे राज्यात रेमडेसीव्हिर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवायला लागला आहे. यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नाशिक येथे माध्यमांशी ते संवाद साधत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसं जगवण्यासाठी मिळेल त्या लस घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पाहिलं नाही, असं सांगतानाच आपल्याकडेही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही हीच लस घ्या, आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहिजे पहिला. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांना द्या, असं भुजबळ म्हणाले. झालं गेलं विसरून आता पुढे गेलं पाहिजे. पुन्हा जोमाने लसीकरण केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

सुरुवातीला अनेकांनी रेडेसीवीर लस नेल्या. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. एक दोन दिवसात हा गोंधळ संपुष्टात येईल. ही काही क्रोसिनची गोळी नाही की लगेच मिळेल. सहज मिळणारं हे औषध नाही. त्यात अडचणी आहेत. राज्यभर अडचण अडचण आहे, हे मी नाकारत नाही. राज्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. कोरोनाचा ज्वालामुखी फुटेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे साठा केला नाही, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी निर्बंध पाळणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रेमडेसीवीर मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत, याकडे भुजबळांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, लोकं रस्त्यावर उतरणार त्याला काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळलं तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading