Saturday, May 30, 2026
PUNE

‘देव–बिव’ दिनदर्शिकेमधून वाचायला मिळणार पुण्यातील जुन्या मंदिरांच्या रंजक कथा

पुणे, दि. ५ – पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांबरोबरच आणि पुण्याबाहेरच्या प्रत्येकाला पुण्यातल्या अनेक गोष्टींचे अप्रूप असते. पुण्यातील मंदिरांचा सांस्कृतिक इतिहास आणि त्यामागील रंजक कथा हा यातीलच एक भाग होय. पुण्यातील तेजस गोखले या तरुणाने आपल्या ‘खलबत्ता’ या नव्या ब्रँड अंतर्गत अशाच नाविन्यपूर्ण गोष्टी एकत्रित करीत ‘देव–बिव’ या मराठी नवर्षाप्रमाणे काढलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडल्या आहेत.

शहरातील भिकारदास मारुती, निवडुंग्या विठोबा, जिलब्या मारुती, डुल्या मारुती, खुन्या मुरलीधर, दाढीवाला दत्त, पासोड्या विठोबा, सोन्या मारुती, पत्र्या मारुती, सोत्या म्हसोबा, उपाशी विठोबा आणि विसावा मारुती या जुन्या मंदिरांच्या कथा, त्यामागील गंमत अत्यंत मोजक्या पण प्रभावी शब्दात आणि चित्र स्वरूपात (illustrations) मांडण्याचा प्रयत्न त्यांनी याद्वारे केला आहे.

तेजस गोखले हे गेली १० वर्ष मिडीया अॅण्ड अॅनिमेशन या क्षेत्रात कार्यरत असून क्रिएटिव्ह स्प्ल़ॅश या कंपनीच्या ‘खलबत्ता’ या नव्या ब्रँड अंतर्गत अशा नाविन्यपूर्ण गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे. या दिनदर्शिके विषयी अधिक माहिती देताना गोखले म्हणाले, “शब्दांबरोबरच, चित्र स्वरूपात पुण्यातील या मंदिरांच्या कथा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने मी या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. या बरोबरच मराठी भाषा टिकविण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून या दिनदर्शिकेत मराठी आकडे, मराठी महिने आहेत, मराठी साल देखील देण्यात आले आहे. विशेष म्हणजे येत्या मराठी नववर्षाचे म्हणजेच गुढी पाडव्याचे औचित्य साधून ही दिनदर्शिका तयार केली आहे आणि अकाउंटिंग (accounting) वर्षाप्रमाणे एप्रिल ते मार्च ही दिनदर्शिका असेल असाही एक विचार ही दिनदर्शिका आत्ता  करण्यामागे आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading