ओयो हॉटेल्स कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कोव्हिड लसीकरणाचा खर्च उचलणार 

पुणे, दि. २ –  भारतात सुरू असलेल्या कोव्हिड – १९ लसीकरण कार्यक्रमात लस टोचून घेणा-या सर्व स्तरावरील कर्मचा-यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणाचा खर्च  देणार असल्याची घोषणा ओयो हॉटेल्स अँड होम्स ने केली आहे. या निर्णयामुळे ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या कर्मचा-यांना  त्यांना सोयीस्कर असेल अशा केंद्रावर लस टोचून घेता येईल आणि त्याचा सर्व खर्च ओयो देईल.  याशिवाय, कोव्हिड -१९ वर घरी होणा-या उपचारांचा खर्च कर्मचा-यांच्या विमा संरक्षणात समाविष्ट केला आहे.  

आपला कर्मचारी वर्ग  अधिक सुदृढ, वैविध्यपूर्ण, समावेशक आणि कार्यक्षम असावा यासाठी आणि त्यांचे स्वास्थ्य केंद्रस्थानी ठेवून ओयो दरवर्षी आपले कर्मचारी धोरण सुधारत असते.  कोव्हिड महामारीच्या प्रादुर्भावानंतर पाच दिवसांचा आठवडा अमलात आणणारी ओयो ही पहिली स्टार्ट अप कंपनी होती. आता कंपनीने दरवर्षी मोफत आरोग्य  तपासणी, २४ तास वैद्यकीय साह्य, वैयक्तिक समुपदेशन याबरोबरच कोव्हिड -१९ च्या तपासणीसाठी बुकिंग करणे, ऑनलाइन पद्धतीने औषधे मागवणे अशा आणि इतर अनेक सुविधा कर्मचा-यांना दिल्या आहेत.  याशिवाय मानसोपचार आणि बाळंतपणासाठी ज्यादा विमा संरक्षण असेही फायदे उपलब्ध केले आहेत.  

कामाच्या ठिकाणी वैविध्य आणि समावेशकता असावी यासाठी ओयो ने राइज इक्वली ही अपत्य प्राप्तीच्या वेळी पुरुष कर्मचा-यांना मिळणारी रजा २ आठवड्यांवरून ४ आठवडे केली. ही रजा अपत्य जन्माच्या आधीच्या किंवा नंतरच्या १२ महिन्यात कधीही घेता येते.  कर्मच-यांना पहिल्या अपत्याच्या वेळी ८ आठवडे घरून काम करण्याची सवलत मिळेल आणि ही सवलत अर्धपगारी तत्वावर आणखी ८ आठवडे वाढवता येईल. ओयो च्या नव्या पालकत्व धोरणात नैसर्गिक, दत्तक घेणे किंवा सरोगसी पद्धतीने होणारी अपत्यप्राप्त मान्य करण्यात आली आहे. 

ओयो हॉटेल्स अँड होम्स चे मुख्य मनुष्यबळ अधिकारी दिनेश राममूर्ती म्हणाले, भारतातील लसीकरणाचा वेग उत्साहजनक आहे. आपण सारेच कोव्हिड-१९ च्या संकटाशी यथाशक्ती लढत आहोत. आमचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहावे म्हणून आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या कोव्हिड लसीकरणाचा खर्च उचलत आहोत. लसीकरणाबद्दल पूर्ण माहिती मिळवून लस टोचून घेण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचा-यांना  प्रोत्साहन देतो.

Leave a Reply

%d bloggers like this: