तपस्या आणि समर्पणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डाॅ. सुजाता नातू – कृ. गो. धर्माधिकारी
पुणेः- पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला साजेसे कार्यकर्तृत्व कथक नृत्य क्षेत्रात करून या कलेला पुण्यामध्ये समाज मान्यता मिळवून देण्यात ज्येष्ठ कथक गुरु पंडिता डॉ. सुजाता नातू यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.तपस्या आणि समर्पणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डाॅ. सुजाता नातू होय, असे मत गानवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृ.गो.धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविलेल्या गानवर्धन संस्थेतर्फ ज्येष्ठ कथक गुरु पंडिता डॉ.सुजाता नातू यांचा त्यांच्या सहस्रचंद्रदर्शना निमित्त धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी कृ.गो. धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
यावेळी सुरेश नातू, गानवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद घोटकर आणि सविता हर्षे आदी उपस्थित होते.
कृ.गो.धर्माधिकारी यावेळी म्हणाले की, पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात नृत्यकलेला समाजमान्यता
नसताना शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ही कला विद्येशी जोडण्याचे आव्हान स्वीकारून सुजाता नातू यांनी ते यशस्वीपणे पूर्ण केले.तसेच नृत्य फक्त श्रीकृष्ण आणि नटराजा पर्यंत मर्यादित न ठेवता त्याचा आयाम वाढवून संत कवी ते वेस्टर्न अशा विविध रचनांवर नृत्य
प्रस्तुती करणे आणि त्याला आधुनिकतेकडे नेणे हे पायोनिअरिंग कार्य तेंव्हा पासून डॉ. सुजाता नातू यांनी केले.
सत्काराला उत्तर देतांना ज्येष्ठ कथक गुरु पंडिता डॉ. सुजाता नातू म्हणाल्या, आजच्या ह्या सत्कार समारंभाने मी भारावून गेले आहे. करोनाच्या पार्श्वभुमिवर कोणी कोणाला भेटू शकत नाही आहे. जाहीर सांस्कृतीक कार्यक्रमांवर बंदी आहे तरी देखील गानववर्धनने घडवून आणलेला हा सत्कार मी घरातल्या लोकांनी केलेले काैतुक या भावनेतुन स्विकारते.
सुरेश नातू यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.गानवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद घोटकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर सविता हर्षे यांनी आभार मानले.
