Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRAPUNE

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे मराठी चित्रपटांचा दुर्मिळ खजिना प्राप्त

ताई तेलीण’ ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘देव पावला  आदी चित्रपटांचा समावेश

पुणे, दि. २६ – मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समृद्धीत नव्याने भर पडली आहे. १९५० ते १९७० या दोन दशकाच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या फिल्म्स १६एमएम ते ३५ एमएम स्वरूपातील आहेत. विशेष म्हणजे या खजिन्यात ‘ताई तेलीण’ ( १९५३ ), आणि ‘पवनाकाठचा धोंडी’  ( १९६६ ) या एकेकाळी ‘हरवल्या’ गेलेल्या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आर्यन फिल्म कंपनीने केली होती आणि त्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुजारराव पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. पी. भावे आणि अंतो नरहरी यांनी केले होते तर संगीत मास्टर कृष्णराव यांनी दिले होते.

       ‘ ताई तेलीण’ प्रमाणेच ‘हरवली’ म्हणून आतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची  फिल्मही मिळाली आहे. अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९६६ साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. अनंत ठाकूर यांनीच राजकपूर आणि नर्गिस या जोडीचा गाजलेला ‘चोरी चोरी’ हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला होता.’पवनाकाठचा धोंडी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटाची निर्मिती ‘श्री महालक्ष्मी चित्र’ या बॅनरखाली गायिका उषा मंगेशकर यांनी केली होती. तर चित्रपटात चंद्रकांत, सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन सख्ख्या भावांनी या चित्रपटात सख्ख्या भावाचीच भूमिका केली होती हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या एका प्रकल्पातंर्गत भाग घेताना अभिनेते सूर्यकांत यांनी अतिशय भावनाशील होऊन या आठवणींना उजाळा देताना या दुर्मिळ योगायोगाचा उल्लेख केला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ याच कादंबरीवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या चित्रपटाला संगीत दिले होते.

 या दुर्मिळ चित्रपटांच्या खजिन्यात राम गबाले यांच्या ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटाचाही समावेश आहे. दामूअण्णा मालवणकर आणि विष्णुपंत जोग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील प्रभात स्टुडिओत झाले होते. याशिवाय अन्य मराठी चित्रपटात रंजन कुमार यांचा ‘भाऊबीज’ ( १९५५ ), माधव शिंदे यांचा ‘अंतरीचा दिवा’ ( १९६० ), दत्ता धर्माधिकारी यांचा ‘सुभद्राहरण” ( १९६३ ), वसंत पेंटर यांचा ‘बारा वर्षे, सहा महिने तीन दिवस, ( १९६७ ), राज दत्त यांचा ‘धाकटी बहीण” (१९७०), केशव तोरो यांचा ‘पुढारी’ (१९७२), गोविंद कुलकर्णी यांचा ‘ बन्याबापू ‘ ( १९७७ ), राजा बारगीर यांचा ‘दीड शहाणे’ (१९७९ ), सुशील गजवानी यांचा ‘राखणदार’ ( १९८२ ) आणि कांचन नायक यांचा ‘कळत-नकळत’ ( १९८९ ) आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा ‘साधी माणसं ‘ ( १९६५ ), राजा ठाकूर यांचा ‘राजमान्य राजश्री’ ( १९५९), राज दत्त यांचा ‘एकटी’ ( १९६८ ), ‘घरकुल’ ( १९७० ), रमेश देव यांचा ‘छंद प्रीतीचा’ ( १९६८ ) आणि ‘जिवा-सखा’ (१९९१) या गाजलेल्या यामध्ये चित्रपटांचाही समावेश आहे. 

 मराठीबरोबरच काही प्रमुख हिंदी चित्रपटांचाही या खजिन्यात समावेश आहे. शक्ती सामंत यांचा कृष्णधवल रंगातील ‘नॉटी बॉय’ ( १९६२ — नायक किशोर कुमार ), मोहन कुमार यांचा ‘अमन’ (१९६७ — नायक राजेंद्रकुमार ), ज्यामध्ये प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल आणि गझल सम्राट जगजीत सिंग यांचे दुर्मिळ दर्शन घडलेले आहे. तसेच अन्य प्रमुख हिंदी चित्रपटांमध्ये रवींद्र दवे यांचा  ‘गेस्ट हाऊस’ ( १९५९), एम. सादिक यांचा  ‘ताजमहाल’ (१९६३), मोहम्मद हुसेन यांचा ‘शिकारी’ ( १९६३), केवल मिश्रा यांचा ‘दो यार’ ( १९७२) आणि अलो सरकार दिग्दर्शित आणि उत्तमकुमार अभिनित ‘बंदी’ (१९७८) आदी चित्रपटांचा समावेश आहे.   

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा तसेच काही दुर्मिळ हिंदी चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, ‘ ताई तेलीण’ प्रमाणेच ‘हरवली’ म्हणून आतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची  फिल्मही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झाल्यामुळे त्याचा दुहेरी आनंद होत आहे. संबंधित चित्रपट निर्माते, वितरक, वैयक्तिक संग्राहक यांनी आपल्याकडील दुर्मिळ फिल्म्स.तसेच  चित्रपटविषयक साहित्य आणि अन्य माहिती जतन करून ठेवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading