निवृत्त सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे कोरोनामुळे निधन
पुणे – पुणे शहर पोलिस दलातील निवृत्त सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते (वय 61) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी, सून असा परिवार आहे. पोलीस दलातील अत्यंत मनमिळावू आणि हसतमुख अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
मोहिते यांनी पोलिस दलात येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी उपनिरीक्षक पदावरून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर पुणे शहर व ग्रामीण, मुंबई तसेच राज्यातील विविध ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. पुण्यातील येरवडा, हिंजवडी, वानवडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून दीड वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. पोलिस दलासह सर्वसामान्य नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसोबत त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनाने पोलिस दलासह सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
