कानेटकरांच्या नाटकांमुळे साहित्याचे दालन समृद्ध : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : मानवी जीवन व्यवहारातल्या घटनाप्रसंगातली तात्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारे रचना कौशल्य, उत्तम प्रयोगनिर्मिती मूल्ये आणि प्रेक्षकाभिरूचीचे भान या गुण वैशिष्ट्यांमुळे कानेटकरांची कारकीर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली. या मनस्वी नाटककाराच्या सर्जनयात्रेमुळे मराठी साहित्यातील नाटकांचे दालन समृद्ध झाले. कानेटकर हे परिणत प्रज्ञेचे चतुरस्र नाटककार होते.  असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. जोशी यांच्या हस्ते कानेटकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, बंडा जोशी, प्रा. माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे, प्रमोद आडकर, उद्धव कानडे,  पुणे शहर प्रतिनिधी सतीश देसाई उपस्थित होते. 

प्रा. जोशी म्हणाले, ‘किर्लोस्कर देवलांपासून उदय पावलेली आणि खाडिलकर-गडकरींच्या काळात ऐश्वर्यसंपन्न झालेली मराठी रंगभूमी मूकपट आणि बोलपट निर्मितीच्या आरंभ काळात मोडकळीस आली होती. नाटक कंपन्या बंद पडल्या होत्या. नट बेकार झाले होते. प्रेक्षक सिनेमाकडे वळले होते अशा काळात मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम नाटककार आचार्य अत्रेंनी केले. १९५० नंतर रंगभूमीची ही समृद्धी टिकवून ठेवण्याची आणि त्यात मोलाची भर घालण्याची महत्त्वाची कामगिरी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, पु. ल. देशपांड. चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर या नाटककारांनी केली.

‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक कानेटकरांच्या लेखनप्रवासातील जसा एक मानबिंदू आहे तसंच एकूण मराठी सुखात्मिका, नाट्यलेखनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या त्यांच्या ऐतिहासिक नाटकाने प्रयोगसंख्येचे उच्चांक निर्माण केले आणि वसंत कानेटकर हे व्यावसायिक नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले.’

Leave a Reply

%d bloggers like this: