मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण एटीएसकडे सोपवणार- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यापासून अनेक गौप्यस्फोट समोर येत आहेत. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
स्फोटकांनी भरलेली कार ज्या मालकाची होती, त्या मालकाचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे आज सापडला. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत चौकशी सुरू असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
मनसुख हिरेन कोणत्याही तणावात नव्हते, तसेच ते पट्टीचे स्विमर होते त्यामुळे ते पाण्यात आत्महत्या करूच शकत नाही असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. तर, हात बांधून कोणीही आत्महत्या करणार नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
हिरेन यांच्या मुलाचं काय म्हणणं आहे?
मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन हे काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडले आणि ते परतलेच नाही. ते पायी घराबाहेर गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान एक ऑडिओ क्लिप हिरेन यांच्या मुलाची व्हायरल होते आहे. त्यानुसार हिरेन यांना पोहता येत होतं आणि ते आत्महत्या करण्याची शक्यताही कमी असल्याचंही मुलगा म्हणतो. मित हिरेन असं मुलाचं नाव आहे. हा घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
मनसुख हिरेन यांनी काय जबाब नोंदवला होता?
गाडीचे मालक मनसुख हिरेन यांना क्राईम ब्रांचने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. माझी गाडी 17 तारखेला संध्याकाळी गाडीचे स्टेअरिंग जॅम झाले होते. मला मुंबईत तात्काळ एका कामासाठी यायचे होते म्हणून मी ऐरोली ब्रिजजवळ गाडी पार्क करून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी तिथे गेलो असता गाडी जागेवर नव्हती. मी गाडीचा तीन तास शोध घेतला. आरटीओने ताब्यात घेतली आहे का ते ही चेक केले. मात्र गाडी सापडली नाही म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांनी मीडियाशी बोलताना दिली होती.
