मोदींनी घेतली कोरोना लस
नवी दिल्ली, दि. १ – देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भातील फोटो मोदींनी स्वतः ट्विट केला आहे. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. मात्र लस घेताना त्यांच्याचेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली त्यांनी मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातला होता, हे दाखवणारा फोटोही पोस्ट केला आहे.
मोदींनी ट्विटरवरून फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, ‘एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे, जे जे लोक लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असे मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुया.’
दरम्यान, केंद्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आज सोमवार १ मार्चपासून सुरू होतोय. वय वर्षे ६० तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे.
