fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

भारतीय खेळण्यांना भविष्यात मोठी मागणी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे: “भारतातील विद्यार्थ्यांनी आपले खेळ बनवायला हवेत. ज्यामधून भारतीय संस्कृती आणि मूल्यांची ओळख जगाला होईल. येत्या काही वर्षात आपण खेळण्यांच्या माध्यमातून जगावर राज्य करत असू. आपली संस्कृती आणि वारसा यावर अभ्यास करून संशोधन करणे आणि नवीन कलाकृती तयार करणे हे खरे शिक्षण आहे. घोकंपट्टी आणि लिखाणातून हे साध्य होत नाही. त्याला अशा उपक्रमाची जोड असावी लागते. मुक्तांगण विज्ञानशोधिकेचे प्रदर्शन नक्कीच नवी उंची गाठेल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ या विज्ञान खेळणी आणि प्रकल्प ऑनलाईन प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी जावडेकर बोलत होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे माजी संचालक डॉ. ज्येष्ठराज जोशी, भारतीय विद्याभवन संस्थेच्या अध्यक्षा लीना मेहंदळे, संस्थेचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, विज्ञानशोधिका केंद्राच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदी उपस्थित होते. डासाल्ट सिस्टिम्स ला फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “भारतीय मूल्य, तत्व आणि वारसा यावर आधारीत खेळणी बनविणे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. तंत्रज्ञानामुळे जगभरातील मुले हे खेळ खेळू शकतील. पूर्वी विटीदांडू, लगोरी, भवरा यांसारखे मराठी खेळ खेळले जायचे. आजकालची पिढी मोबाइल आणि संगणकात अडकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी उत्कट प्रयत्न करतात. तंत्रज्ञानामुळे आपण नव्या पिढीला आपली संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून देऊ शकतो. मोबाइल आणि संगणकातील हिंसक खेळामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.”      

डॉ. ज्येष्ठराज जोशी म्हणाले, ‘खेल खेल में’ हा कौतुकास्पद उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी संशोधक होऊ शकतात. इतर देशात मुबलक सामग्री, ग्रंथालय, इंटरनेट इ. हे सर्व उपलब्ध असते परंतु क्षमता आणि एकाग्रता खूप महत्वाची आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी हे दोन मूल्य लक्षात ठेवून हसतमुखाने सर्व स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. संशोधकाला प्रत्येक वेळी यश मिळतच असे नाही. बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागते. या अपयशातूनच आपण जास्त शिकू शकतो. ‘खेल खेल में’ या उपक्रमामुळे मुलांना नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवता आल्या असतील.”  

मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे महाराष्ट्रभर ‘खेल खेल में’ ही खेळणी, गेम, प्रकल्प डिझाइन स्पर्धा घेण्यात आली होती. दोन स्तरामध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम फेरीमध्ये ६२२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातून १२७ विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. जिंकलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रजत अगरवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading