राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप

पुणे, दि. २१ – डाॅ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप डाॅ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने झाला.

वसंतोत्सवाच्या समारोपाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

समारोपाआधी नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, ते म्हणाले, “नाटक, चित्रपट आणि गाणं ही दृष्य माध्यमे आहेत. ऑनलाईन माध्यमांमध्ये दृष्य माध्यमांसारखी मजा नाही. समोर गाणं सुरू असताना त्यामध्ये रंग भरण्याची मुभा ही रसिक प्रेक्षकांना असते. यातच खरी मजा आहे असे मला वाटते.”

यानंतर राहुल देशपांडे यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग कौशी कानडामधील ‘राजन के…’ या रचनेने आपल्या गायनाला सुरूवात केली. यानंतर त्यांनी द्रुत तीन तालातील ‘काहे करत मोसे बरजोरी’ ही रचना पेश केली.

रियाज हा रंगाचा डबा आहे, पण जेव्हा आपण रागाचे चित्र रेखाटायला जातो तेव्हा आवश्यक तितकाच रंग वापरावा लागतो नाहीतर बेरंग होते, असे आजोबा नेहमी म्हणायचे, हे किती योग्य आहे हे आता समजते आहे. वसंतोत्सवाच्या स्टेजवर सादरीकरण करताना आजोबा बघत असतात, अशा भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केल्या. डाॅ. वसंतराव देशपांडे यांच्या कार्यक्रमांच्या दौ-यांची आठवण सांगताना  आजकाल गाणं बजावणं होत नाही, तर इव्हेंटस् होतात असे राहुल देशपांडे म्हणाले.

यानंतर त्यांनी राग बसंत मधील पं. कुमार गंधर्व यांची बंदिश पेश केली. मानापमान या संगीत नाटकातील बालगंधर्वांचे  ‘नयने लाजवीत बहुमोल रत्‍ना’ हे नाट्यगीत त्यांनी सादर केले. यानंतर ‘सुनता है गुरू ज्ञानी’ या निर्गुणी भजनाने राहुल देशपांडेने आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. डाॅ.  वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या भैरवीने १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप झाला.

त्यांना निखिल फाटक (तबला), डाॅ. चैतन्य कुंटे (संवादिनी),मुराद अली (सारंगी), नारायण खिलारी व जिग्नेश वझे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: