व्यवसाय वाढीसाठी ब्रॅन्डींग महत्त्वाचे – श्रीकृष्ण चितळे

पुणे : व्यवसाय वाढीसाठी ब्रॅन्डींग महत्त्वाचे आहे. व्यवसायाची सुरुवात होते, तेव्हा ब्रॅन्डींगचे महत्त्व लक्षात येत नाही. परंतु व्यवसाय एका विशिष्ट स्तराला पोहोचल्यावर ब्रॅन्डींग महत्त्वाचे आहे. ब्रॅन्डींग, ब्रॅन्ड आणि आपल्या उत्पादनाची नोंदणी करणे हे अतिशय गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्या उत्पादनाची नक्कल कोणालाही करता येणार नाही, असे मत चितळे बंधू मिठाईवालेचे श्रीकृष्ण चितळे यांनी व्यक्त केले.

बिझनेस मंत्रा संस्थेच्या वतीने बिझनेस आयकॉन इमर्जिंग अ‍ॅवार्डस २०२१ चे आयोजन एरंडवण्यातील द सिनेट बिझिनेस सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी शारंगधर फार्माचे डॉ.जयंत अभ्यंकर, विक्रांत वर्तक, अभिजित केळकर, बिझनेस मंत्राचे पराग गोरे यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यवसायातील अतुलनीय योगदानाबद्दल चितळे बंधू मिठाईवालेचे श्रीकृष्ण चितळे आणि शारंगधर फार्माचे डॉ.जयंत अभ्यंकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

डॉ. जयंत अभ्यंकर म्हणाले, आजच्या काळात स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेत टिकून राहणे आवश्यक आहे. ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यातील काय निवडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशावेळी  ब्रॅन्डला निवडणे ग्राहकांना सोपे जाते. ब्रॅन्ड बनविण्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची आहे. उत्पादनाच्या दर्जेवर ब्रॅन्डींग आपोआप होते,परंतु आपणही प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
पराग गोरे म्हणाले, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस मंत्राच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. उभरत्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी टॉक शो आणि कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात येते. मागील ११ वर्षापासून उद्योजकांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. असेही त्यांनी सांगितले.  वैशाली वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. पराग गोरे यांनी प्रास्ताविक केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: