fbpx
Sunday, May 19, 2024
PUNETOP NEWS

‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १२ – ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाचे उद्घाटन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी दीपप्रज्वलन करून आणि पं. भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होत आहे.

पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा सन्मान पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आला.

‘कलाकारांना पिढ्यानपिढया सन्मान मिळावा, कला वृद्धींगत होत राहावी, आणि त्यांची मेहनत सुफळ संपन्न व्हावी ‘ , अशी सदिच्छा पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी छोटेखानी भाषणात व्यक्त केली.

उद्घाटनप्रसंगी हरिप्रसाद चौरसिया, पं.उदय भवाळकर, पं.विजय घाटे पं.उल्हास कशाळकर, पं. विकास कशाळकर, पं.अतुलकुमार उपाध्ये, पुनीत बालन, श्रीकांत बडवे, श्रीपाद चितळे, गोविंद बेडेकर,मंजुषा पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अखंडपणे होत असलेल्या ‘ख्याल यज्ञ’ संगीत महोत्सवात देशातील दिग्गज तसेच नवोदित मिळून ३९ कलाकारांचे सादरीकरण होत आहे.३९ गायक ,१४ तबला वादक ,१० पेटीवादक , १ सारंगी वादक , ४ निवेदक यांचा सहभाग हे या संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे .

१२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजता पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाने या “खयाल यज्ञाची” सुरुवात झाली. राग तोडी, अहिर भैरव मधील बंदिश भुवनेश कोमकली यांनी सादर करून, तर पं. अजय पोहनकर यांनी राग बसंत बुखारी सादर करून रसिकांची मने जिंकली.

शुक्रवारी पहिल्या दिवशी पं. उदय भवाळकर, पं. भुवनेश कोमकली, विजय कोपरकर, पं. व्यंकटेश कुमार, आरती ठाकूर -कुंडलकर, पं.कैवल्यकुमार गुरव, सायली तळवलकर, धनंजय हेगडे, सौरभ काडगावकर, अलका देव – मारूलकर, पं. शौनक अभिषेकी , श्रुती सडोलीकर – काटकर, पं. अजय पोहनकर, उस्ताद राशिद खान यांचे बहारदार गायन आयोजित करण्यात आले होते.

१३ फेब्रुवारी रोजी अश्विनी भिडे -देशपांडे,पंडित डॉ राम देशपांडे,पं जयतीर्थ मेवुंडी,सावनी शेंडे-साठे,संदीप रानडे,सौरभ नाईक,ओंकार दादरकर,पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा,पद्मा तळवलकर इत्यादी मान्यवर गायक सादरीकरण करणार आहेत.

१४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर,कलापिनी कोमकली,राहुल देशपांडे,निषाद बाक्रे ,देवकी पंडित,विनय रामदासन,गौतम काळे,रघुनंदन पणशीकर ,मंजुषा पाटील ,पंडित राजन मिश्रा ,पंडित साजन मिश्र इत्यादी मान्यवर गायनसेवा रुजू करणार आहेत.

दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार महोत्सवाला भेट देणार आहेत, तर दु. ४:३० वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती व्हिडीओ संदेशा द्वारे असणार आहे .
१४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता विधान परिषद उप सभापती डॉ नीलम गो-हे या महोत्सवाला भेट देणार आहेत.

पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थिती मध्ये “खयाल यज्ञाचा” समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ‘संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव सौ. मंजुषा पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading