तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त मसूरडाळ, तांदूळ आणि हिरवेमूग वापरुन ६ बाय १० फूट आकारातील भारताचा नकाशा साकारण्यात आला. भारताच्या राष्ट्रध्वजावर असलेला तिरंगा नकाशामध्ये रेखाटण्यात आला आहे. सुमारे दोन तासात ही कलाकृती साकारण्यात आली.

ग्राहक पेठेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रवेशद्वारामध्ये भारताचा तिरंगी नकाशा साकारण्यात आला आहे. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उदय जोशी, भीमाशंकर मेरु, विनायक पवार, उपेंद्र चिंचळकर यावेळी उपस्थित होते. सदाशिव पेठेतील कलातीर्थ संस्थेचे अमोल काळे व सहका-यांनी ही कलाकृती साकारली आहे. याकरीता ५ किलो तांदूळ, ५ किलो मसूरडाळ, ५ किलो हिरवेमूग वापरण्यात आले आहेत. 

सूर्यकांत पाठक म्हणाले, वर्षभर विविध प्रकारचे तांदूळ, डाळी ग्राहकांना उपलब्ध करुन दिले जातात. जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा आम्ही तांदूळ, डाळींच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सुख-समृद्धी मिळो, याकरीता  उपक्रम राबविण्यात आला. सलग दोन दिवस ही कलाकृती पुणेकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.


ते पुढे म्हणाले, इतरत्र तांदूळाच्या भावामध्ये वाढ झाली असली, तरी देखील आपल्यायेथील तांदूळाचे भाव स्थिर आहेत. तांदूळ महोत्सवात ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले

Leave a Reply

%d bloggers like this: