प्रबोधनकारांच्या ‘हुनर’ आणि ‘जिगर’ या गोष्टी शिकल्या पाहिजेत – अरविंद सावंत

पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवन संघर्षमय आणि कष्टप्रद होते. समोर आलेल्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी मार्गक्रमण केले. ते जे बोलत त्याप्रमाणे त्यांचे आचरण असे. अत्याचाराविषयी त्यांना प्रचंड चिड होती. परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रबोधनकारांच्या ठायी असलेल्या ‘हुनर’ आणि ‘जिगर’ या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आज विकली जाणारी लोकशाही पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत यांनी केले.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात आज ‘प्रबोधनकार आणि आजची स्थिती’ या विषयावर सावंत बोलत होते. ते म्हणाले, आशावादी व्हायचे असेल तर संघर्ष करायला शिकले पाहिजे, अशी प्रबोधनकारांची विचारधारा होती. जातीवादाविरोधात प्रबोधनकारांनी लढा उभारला, त्यांना अस्पृश्यांविषयी कणव होती. समाजाप्रती केलेल्या कार्यामुळेच त्यांना समाजाकडून प्रबोधनकार ही पदवी मिळाली आहे.

स्पर्धा परिक्षांना किती मराठी मुले सामोरी जातात असा प्रश्न करून सावंत म्हणाले, मुलगा पदवीधर झाला की, त्याचे पालक नोकरी द्या अशी विनंती करतात. आजही जातीभेद पाळला जात असल्यामुळे प्रबोधनकारांच्या विचारांचा पुन्हा गजर होण्याची आवश्यकता आहे. देशाला दिशा देण्याची ताकद प्रबोधनकारांच्या विचारात असल्याचे ते म्हणाले.

प्रबोधनकार लिखित ‘पावनखिंडीचा आणि विजयादशमीचा पोवाडा’ कोल्हापूरचे शाहीर विशारद आझाद नायकवडी, युवराज पुजारी, अरुण शिंदे यांनी सादर केला. विक्रम परिट (ढोलकी), निशिकांत कांबळे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. त्यानंतर प्रबोधनकारांनी लिहिलेल्या नाटकातील प्रवेश आणि ‘समाजप्रबोधनाकडे जाणारी नांदी’ हा कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विक्रांत आजगावकर यांनी सादर केला. संदिप पवार (तबला), श्रीरंग परब (ऑर्गन) यांनी साथसंगत केली.

संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. सचिन इटकर, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, किरण साळी, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

वक्तृत्वासाठी वाचन आवश्यक : नितीन बानगुडे पाटील 

वक्तृत्वाकडे समाजजीवनाचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. वक्तृत्वासाठी वाचनाचीही खूप आवश्यकता आहे, पण दुर्दैवाने कुणी वाचन करत नाही. वक्तृत्वात सहजता आणि लवचिकपणा हवा. सहजता आणि लवचिकपणा या दोन गोष्टी वक्तृत्वाची आभूषणे आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. प्रबोधन  महोत्सवात ‘वक्तृत्व : कला आणि शास्त्र’ या विषयावर बानगुडे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजजीवनाचा भाग म्हणून वक्तृत्वाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहणारे प्रबोधनकार ठाकरे हे प्रथम व्यक्ती होते. वक्तृत्वावर त्यांनी संशोधनपूर्ण लिखाण करून ठेवले आहे. बोलताना स्थळ – काळाचे भान ठेवावे लागते. ते जर ठेवले नाही तर अनावस्था ओढवते वक्तृत्व ही उपजत कला आहे असे म्हटले जाते पण ही कला उपजत नाही. वक्तृत्वासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, वाचन करावे लागते. जितक्या कमी वेळात तुम्हाला व्यक्त व्हायचे आहे तितका जास्त व्यासंग आवश्यक असतो. वक्तृत्वाबद्दल महापुरुषांच्या भाषणांचे दाखलेही त्यांनी दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: