रामटेकडी इंडस्ट्रीमधील कचरा प्रकल्पाला आग

पुणे – हडपसर रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील 75 टनाच्या खासगी कचरा प्रकल्पाला आग लागली आहे. येथील नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने नरकयातना भोगत आहेत. त्यातच कचरा प्रकल्पाला आग लागल्यामुळे येथील नागरिकांच्या नरकयातना कमी होण्याऐवजी वाढत असल्याने आता येथून घर सोडून जावे का असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दररोज कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी आणि आज कचरा प्रकल्पाला आग लागल्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. त्यामुळे आता येथील नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आमचा नाही, तर निदान लेकराबाळांचा विचार करून कचरा प्रकल्प बंद केला, तर आम्हाला समाधान वाटेल.

मात्र, कचरा प्रकल्प कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढ होत असून, संपूर्ण पुणे शहराचा कचरा हडपसरमध्ये आणून टाकण्यात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी धन्यता मानत आहेत, ही बाब आमचे आयुष्य संपविण्यासाठीच आहे.

दरम्यान नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले की, अग्निशामक दलाच्या आतापर्यंत दहा गाड्या आणि खासगी पाण्याचे टँकर आग विझविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कचरा प्रकल्पामध्ये अग्निशमन यंत्रणा नाही. या ठिकाणी नागरी वस्ती नाही. मात्र, या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. कचरा प्रकल्प कोणाचा आहे, कसा चालविला जातो, याविषयी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: