fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

अनिष्ट प्रथांविरुद्ध प्रबोधनकारांचा लढा; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे प्रतिपादन

पुुणे : प्रभावी लेखन, वक्तृत्व, कृती या त्रिसूत्रींचा अवलंब करून समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध प्रत्यक्ष कृती करण्यावर प्रबोधनकार ठाकरे यांचा भर असायचा. पुण्यातील प्रतिकूल परिस्थितीत महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्य त्यांनी पुढे सुरू ठेवले. माणुसकी, मानवताधर्म पाळणारे खरे ब्राह्मण अशी प्रबोधनकारांची व्याख्या होती. परिस्थितीला सामोरे जाऊन ध्येय साध्य करणे हा त्यांचा मोठा गुण होता, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाची यंदा शताब्दी असून त्याच्या शतकोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संवाद पुणेतर्फे प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त दि. 20 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बोधचिन्ह अनावरण प्रसंगी देविसिंह शेखावत, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची, उद्योजक विशाल चोरडिया, सचिन इटकर, डॉ. शैलेश गुजर, किरण साळी उपस्थित होते.

प्रतिभा पाटील म्हणाल्या, प्रबोधन या नावातच त्याचा काय उद्देश आहे हे लक्षात येते. प्रबोधनकार प्रखर वक्ते, प्रभावी पत्रकार, मोठे लेखक आणि समाजसुधारक होते. महात्मा फुले यांनी अनिष्ट प्रथांविरुद्ध सुरू केलेला लढा त्यांच्या नंतर प्रबोधनकारांनी सुरू ठेवला. संगणक युगात अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणार्‍या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो तर त्या काळी समाजातील कुप्रथांविरोधात लढा उभारण्यासाठी त्यांना केवढा मोठा धोका पत्कारावा लागला असेल? प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी केलेल्या समाजसुधारणेच्या कामाचे खरोखरच कौतुक आहे. अशा विचारांची समाजाला आजही गरज आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीला कळले पाहिजे, हे या पाक्षिकातून होणे आवश्यक आहे. प्रबोधन शतकोत्सवातूनही नवीन पिढी-समाजापर्यंत प्रबोधनकारांचे विचार पोहोचविले जावेेत, अशी अपेक्षा व्यक्त करते.
डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या, आमचे हिंदुत्व प्रबोधनकारी हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाया हा प्रबोधनकारांच्या शिकवणीतून निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये आजही अनिष्ट प्रथा दिसून येतात, महिलांवर अत्याचार होतात, त्यामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्येही प्रबोधनकारांच्या विचारांची परंपरा पाहोचली पाहिजे. सुनील महाजन यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर विधिमंडळात प्रबोधनकारांवर कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन गोर्‍हे यांनी या वेळी दिले.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रबोधन पाक्षिकाच्या शतब्दीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, अशी मागणी संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी केली.
हरिश केंची यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मृणाल केंची यांनी बोधचिन्ह साकारले आहे. उपस्थितांचे स्वागत सचिन इटकर, निकिता मोघे, किरण साळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले तर आभार सचिन इटकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading