fbpx
Sunday, May 19, 2024
ENTERTAINMENTTOP NEWS

‘मुळशी पॅटर्न’च्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन स्टुडिओज घेऊन येत आहे ‘जग्गु आणि Juliet’

  • महेश लिमये यांचे दिग्दर्शन, अजय – अतुल यांचे संगीत
  • ९० टक्के चित्रीकरण होणार युरोपात!
  • It’s a story of soulmate……

‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या आगामी ‘जग्गु आणि Juliet’ चित्रपटाची नववर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा करण्यात आली.

सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

मराठीसह बॉलीवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या महेश लिमये यांना ‘यलो’ या संवेदनशील विषयावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा महेश लिमये दिग्दर्शक म्हणून ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. तर आपल्या अनोख्या संगीताच्या माध्यमातून मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल ‘जग्गु आणि Juliet’ च्या निमित्ताने आपल्या मराठी चाहत्यांना बहारदार संगीत आणि पार्श्वसंगीताची खास मेजवानी घेऊन येणार आहेत. महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप या त्रयींची ही जबरदस्त कथा आणि पटकथा असून त्यातील प्रभावी संवाद हे गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे आहेत.

सोशल मीडियावर नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय असलेल्या ‘जग्गु आणि Juliet’ च्या पोस्टर मध्ये कुणीतरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहे. त्याला लंडनच्या बिग बेनची पार्श्वभूमी लाभलेली आहे. अतिशय आकर्षक मांडणीमुळे लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार असून महेश लिमये यांच्या नजरेतून निसर्ग सौंदर्याने नटलेला युरोप या चित्रपटात हटके अंदाजात बघायला मिळणार आहे.

‘जग्गु आणि Juliet’ चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते पुनीत बालन म्हणाले, आमची पहिली निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक आशयावरील चित्रपटाला रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कोरोनाच्या काळात आम्ही सामाजिक संदेश देणाऱ्या तीन शॉर्टफिल्म्स निर्माण केल्या, त्यांना महाराष्ट्रासह जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०२१ मध्ये प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी वेगळ्या धाटणीचा ‘जग्गु आणि Juliet’ हा चित्रपट घेऊन येत आहोत. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना सहकुटुंब बघता येईल अशी एक अतिशय सुंदर, कलरफुल ‘रॉमकॉम’ कलाकृती भेट म्हणून देण्याचा आमचा मानस आहे.

निर्माते पुनीत बालन, दिग्दर्शक महेश लिमये आणि संगीतकार अजय – अतुल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक शॉर्टफिल्मला जगभरातील रसिकांची पसंती मिळाली आहे. तसेच विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात या कलाकृतीला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आता ‘जग्गु आणि Juliet’ च्या निमित्ताने हे त्रिकुट पुन्हा एकत्र आल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading