Saturday, June 13, 2026
PUNE

येरवडा नागरीक कृती समितीच्या वतीने व्यसन विरोधी जनजागृती

पुणे – व्यसनाची सुरुवात सत्तर टक्के लोक हे थर्टीफर्स्टच्या रात्री करतात. दहावी – बारावी झालो, वाढदिवस, लग्न, समारंभ, सुखदुःख अशी अनेक कारणे सांगत लोक वेगवेगळी व्यसन करतात. मात्र व्यसनाचा शेवट हा नेहमीच वाईट असतो. व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज असून, समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक दत्ता श्रीखंडे यांनी व्यक्त केले. येरवडा नागरीक कृती समिती व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा परिसरातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या व्यसनविरोधी विचार जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी येरवडा पोलिस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे, येरवडा नागरीक कृती समितीचे निखिल गायकवाड, शैलेश राजगुरू, समीर शेख, रुपेश घोलप, नासिर पटेल, मंगेश भोसले, अजय जानराव, अक्षय शेलार यांच्यासह विविध संस्था, संघटना मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

येरवडा परिसरातील वाढती गुन्हेगारी याचे मुख्य कारण म्हणजे व्यसनाच्या आहारी मोठ्याप्रमाणावर आहारी गेलेली तरुण पिढी आहे. दारू, गांजा तसेच इतर अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण तसेच अल्पवयीन बालकां कडून खून मारामाऱ्या तसेच इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुणपिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येरवडा नागरीक कृती समितीच्यावतीने गुरुवारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी व्यसन विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक दत्ता श्रीखंडे यांनी स्व अनुभवातून व्यसनामुळे झालेली आयुष्याची धूळधाण, गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यातून आयुष्याच्या शेवटपर्यंत गेल्याचा प्रवास कथन केला. मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून स्वतः व्यसनांवर मात करून त्याच ठिकाणी नोकरी,लग्न,उच्च शिक्षण, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच देशाचे पंतप्रधान यांनी मन की बात मध्ये त्यांची घेतलेली नोंद असा धक्कादायक प्रेरणादायी प्रवास कथन केला. व्यसनमुक्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने तसेच समाजातील विविध संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. येरवडा नागरीक कृती समितीच्यावतीने व्यसन विरोधी जनजागृती कार्यक्रम या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी कौतुक केले. या उपक्रमाला येरवडा पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहील असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. येरवडा परिसरातील अवैध धंदे तसेच विविध प्रकारे केली जाणारी व्यसने रोखण्यासाठी येरवडा पोलिसांकडून सातत्याने प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली.

वस्ती पातळीवरील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे होणारे नुकसान ही समाजातील अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब असून या उपक्रमाला येरवडा परिसरातून मदत व सहकार्य करू असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोसले यांनी दिले. यावेळी उपस्थित तरुणांच्या विविध प्रश्‍नांचे समुपदेशक दत्ता श्रीखंडे व पोलीस अधिकारी यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून प्रबोधन केले. येरवडा परिसरातील विविध संस्था-संघटना मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम स्थानिक वस्ती पातळीपर्यंत घराघरात राबवण्यात येणार असल्याचे यावेळी संयोजक शैलेश राजगुरू यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading