पीएमपीच्या स्वारगेट आगारात दत्त जयंती उत्साहात साजरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविला स्तुत्य उपक्रम
पुणे, दि. 29 – पीएमपीएमएल च्या स्वारगेट आगारात असणाऱ्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच निराधार आणि अंध व अपंग मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
स्वारगेट आगारात दरवर्षी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या हेतूने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्वारगेट आगारातील श्री दत्त सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगारांच्या वर्गणीतून धान्यसाठा, गोडेतेलाचे डबे, इतर किराणा, कांदा व लसूण यांची पोती या दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या जीवनावश्यक वस्तू स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशन पुणे संचलित “आपलं घर” व “लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था” पुणे या संस्थेतील मुलांना पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आल्या.
यावेळी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, प्रशासन अधिकारी नितिन घोगरे, कामगार व जनता संपर्क अधिकारी आणि खातेनिहाय चौकशी अधिकारी सतिश गाटे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे, आगार अभियंता मनोहर पिसाळ यांच्यासह स्वारगेट आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वारगेट आगारातील रविंद्र चव्हाण व वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
