दत्तनामाचा जयघोष आणि पुष्पवृष्टीने दत्तजन्म सोहळा संपन्न
पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या गजरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा उत्साहात पार पडला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा ट्रस्टचे विश्वस्त व मोजक्या सेवेक-यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंदिराबाहेर लावलेल्या एलईडी स्क्रिनवरुन हा सोहळा डोळ्यात साठविताना भाविकांनी केलेल्या दत्तगुरुंच्या जयघोषाने कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंती उत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करुन दिगंबरा, दिगंबरा… असा जयघोष करण्यात आला. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे. दत्तजन्मानिमित्त दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीची फुलांमधील आकर्षक प्रतिकृती तसेच संपूर्ण मंदिरावर विविधरंगी फुलांनी व विद्युतरोषणाईने सजावट करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अॅड.एन.डी.पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई यांसह पदाधिकारी, सेवेकरी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष व वंदना मोहिते यांच्या हस्ते लघुरुद्र पार पडला. तसेच, विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांसह लीना लोंढे आणि समीर व अस्मिता भुजबळ यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी ८ व दुपारी २ वाजता दत्तयाग झाला. रामोजी सिटी, हैदराबादचे सीईओ राजीव जालनापूरकर यांनी सपत्नीक प्रात:आरती केली. तर, दुपारी १२.३० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते माध्यान्ह आरती झाली.
ह.भ.प.चारुदत्त आफळे यांनी कीर्तनातून दत्तजन्माची कहाणी आणि दत्तगुरुंचे महात्म्य सांगितले. भक्तांसाठी सकाळी ६ पासून मंदिर खुले करण्यात आले होते. मास्क, सॅनिटायझर व इतर नियम पाळून दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात येत होते. तसेच यंदाचे सर्व कार्यक्रम ट्रस्टच्या कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे – https://www.facebook.com/107521001159281 या फेसबुक पेजवरुन भाविकांना घरबसल्या पाहण्याची सोय करण्यात आली होती.
