रक्तदान ही सामाजिक जबाबदारी अण्णा थोरात यांचे मत
पुणे : सध्या पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. वाद्यपथकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी पुढे येत रक्तदान केले पाहिजे. रक्तदान ही सामाजिक जबाबदारी आहे या भावनेने रक्तदान करा, असे मत अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळ आणि शिवगर्जना वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगर्जना वाद्य पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, दादा मोरे, नारायण चांदणे, अजय झवेरी, सुरज थोरात, शिवगर्जना वाद्य पथकाचे प्रमुख ललित पवार, अजय साळुंके, विलास साळुंके उपस्थित होते.
रक्तदाते राम बांगड, सारंग यादवाडकर, अनिल नहार, अंजू सोनावणे, सदाशिव कुंदेन, दत्ता सागरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भारती हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि पी.एस.आय ब्लड बँक यांनी रक्ताचे संकलन केले आहे.
राम बांगड म्हणाले, कोरोनामुळे पुण्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात आहे. रक्तदान करुन आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदान व्हायला हवे. समाजकार्य करण्याचा रक्तदान हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन रक्तदान केले पाहिजे, असेही राम बांगड यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.
