Thursday, September 3, 2026
SportsTOP NEWS

पायाभूत सुविधामुळेच पुण्याची निवड – क्रीडामंत्री सुनील केदार

पुणे – क्रीडा विद्यापीठाचा विषय अनेक वर्षे रेंगाळत होता. या विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत आहेत म्हणूनच आम्ही पुण्यातच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव विधानसभेत एक मताने मंजूर करण्यात आला आणि राज्यपाल माननीय श्री. भगतसिंग कोशियारी यांनी विनाविलंब त्यावर स्वाक्षरी केली म्हणूनच क्रीडा विद्यापीठाचे स्वप्न साकार होत आहे. इसवी सन २०२४ आणि २०२८ मध्ये येथील खेळाडू ऑलिंपिक पदकावर नाव कोरतील अशी खात्री केदार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धानिमित्ताने येथील क्रीडा नगरीत उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्या आहेत आणि त्यांची देखभाल चांगली होत आहे. या सुविधांचा वापर केला तर आगामी विद्यापीठाकरिता पुन्हा नव्याने क्रीडा सुविधा तयार करण्याची गरज भासणार नाही आणि शासनाचा पर्यायाने लोकांचाच पैसा वाचणार आहे असेही केदार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या आणि दुर्दैवाने पदक  न मिळवू शकणाऱ्या खेळाडूंनाही चांगल्या दर्जाची नोकरी मिळेल असे प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यादृष्टीने वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करारही केले जाणार आहेत. क्रीडा क्षेत्रात खेळाडू, प्रशिक्षक, सांख्यिकी, क्रीडा छायाचित्रकार, फिजिओ, क्रीडा इव्हेंट मॅनेजमेंट, क्रीडा पत्रकारिता आदी अनेक व्यवसाय क्रीडा क्षेत्रात करू शकतात. त्यादृष्टीनेच येथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत. या विद्यापीठात गरजू आणि गुणवान खेळाडूंना तसेच मुलींना शिक्षणासाठी शुल्क काढताना सवलत दिली जाणार आहे. येथे कोणत्याही खाजगी संस्था किंवा संघटनांचे वर्चस्व राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. परदेशी प्रशिक्षकांऐवजी स्थानिक प्रशिक्षकांमार्फतही जागतिक पदक विजेते खेळाडू कसे घडतील याचाच आम्ही विचार करीत आहोत.

राज्यातील शारीरिक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत त्याबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन केदार यांनी दिले. स्थानिक आणि राज्य स्तरांवरील विविध क्रीडा स्पर्धांच्या संयोजनाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यादृष्टीने आम्ही नियमावली तयार करीत आहोत असेही केदार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पीएमआरडीए चे सुहास दिवसे, आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉक्टर जवाहर सुरिशेट्टी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading