योगसाधनेच्या खऱ्या मूल्यांची कोविड साथीच्या काळातच सर्वांना जाणीव – आयुष मंत्री श्रीपाद नाईक
मुंबई – “कोविड साथीच्या काळात, योग या भारताने जगाला दिलेल्या अमूल्य भेटीमुळे, लोकांना आपल्या केवळ शारिरीक आरोग्याचीच नव्हे, तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत झाली आहे,” असे प्रतिपादन आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद वाय. नाईक यांनी आज केले. ‘द योगा इन्स्टिट्यूट’ने कोविड साथीच्या काळात राबवलेले खास उपक्रम आणि गेल्या 102 वर्षांमध्ये लोकांची व समाजाची केलेली सेवा, याबद्दल नाईक यांनी ‘इन्स्टिट्यूट’चे विशेष कौतुक केले.
‘द योगा इन्स्टिट्यूट’ने आपल्या अविरत सेवेची 102 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्युअल स्वरुपाच्या कार्यक्रमात माननीय मंत्री नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते ‘निस्पंद’ हे ‘टीवायआय मेडिटेशन अॅप’ सादर करण्यात आले. ‘द योगा इन्स्टिट्यूट’ (टीवायआय) या संस्थेने ‘कोविड’च्या लढ्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे नाईक यांनी कौतुक केले.
माननीय मंत्री नाईक पुढे म्हणाले, “द योगा इन्स्टिट्यूट’ने जगभरातील व्यक्तींना सेवा देत 102 वर्षे बजावलेल्या कामगिरीबद्दल मी या संस्थेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. तुमची निष्ठा, प्रामाणिकपणा व सचोटी यांमुळे योगाच्या भारतीय मौल्यवान परंपरेचे जतन होण्यास मदत होत आहे आणि जगातील लाखो लोकांच्या जीवनात दररोज परिवर्तन घडून येत आहे. जागतिक शांततेत तुम्ही सहभागी होणारे आहात. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे आणि ती लोकांपर्यंत काळजीपूर्वक पोहोचविण्याचे विलक्षण कार्य ‘द योगा इन्स्टिट्यूट’ने केले आहे.”
“कोविड साथीच्या कठीण काळात लोकांनी योगाची खरी मूल्ये शिकण्यास सुरुवात केली. योगाच्या सहाय्याने लोकांना त्यांचे शारिरीक स्वास्थ्य व प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत झालीच, त्याचबरोबर मानसिक व भावनिक आरोग्याचे व्यवस्थापनही त्यांना करता आले,” असे नमूद करून मंत्री नाईक यांनी ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या कोविड काळातील उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, “अन्नम ब्रह्मा या चळवळीतून कोरोना योद्ध्यांना मोफत भोजन पुरविण्याबरोबरच, ‘द योगा इन्स्टिट्यूट’ने शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचून आपल्या विहीत कर्तव्यापेक्षाही मोठे व त्यापलिकडचे कार्य केले आहे.”
‘निस्पंद’ या अॅपच्या नियोजित सादरीकरणाची घोषणा मंत्री नाईक यांनी यावेळी केली. “सर्व जग प्रतीक्षा करीत असलेले मेडिटेशन अॅप”, असे त्याचे वर्णन करीत नाईक म्हणाले, “आपल्या तळहातावर प्रत्यक्ष मेडिटेशन अवतरविणारे हे अॅप आहे. ध्यानधारणा करण्याच्या जगाच्या पद्धतींमध्ये ‘निस्पंद’ क्रांती घडविणार आहे. आपल्याला सर्वांगीण आरोग्य मिळविण्यात त्याची मोलाची मदत होईल.”
‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसा जे. योगेंद्र म्हणाल्या, “द योगा इन्स्टिट्यूट’ने समाजाच्या, देशाच्या व जगाच्या सेवेत आज 102 वर्षे पूर्ण केली, त्या निमित्ताने आयोजित झालेल्या या सोहळ्यात उपस्थित राहिल्याद्दल मी माननीय मंत्री श्री. श्रीपाद वाय. नाईकजी व येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर अतिथी यांचे आभार मानते.”
“कोविडच्या साथीचा सामना करण्यासाठी व त्याबाबत मदत पुरविण्यासाठी यंदा आमच्या ‘गृहस्थयोग’ (हाऊसहोल्डर योगा) या सेवेत आम्ही अनेक उपक्रम राबविले. भारतात व जगभरात अधिकाधिक लोकांपर्यंत ‘गृहस्थयोग’ ही संकल्पना नेण्यास ‘द योगा इन्स्टिट्यूट’ कटिबद्ध आहे. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे आमचे गेली 102 वर्षे सातत्याने चाललेले कार्य हे आमचे संस्थापक, योगगुरु श्री योगेंद्रजी यांच्या अधिपत्याखालील योगींच्या तीन पिढ्यांनी घालून दिलेल्या दृष्टिकोनामुळे, तसेच गेल्या शतकभरात ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या कुटुंबाचाच एक भाग बनलेल्या हजारो लोकांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.”
“आज 103 व्या वर्षांत पदार्पण करीत असताना आम्ही ‘निस्पंद मेडिटेशन अॅप’ सादर केले आहे. पुढील शंभर व त्यापेक्षाही अधिक वर्षांत लाखो लोकांना ‘गृहस्थयोगा’चे लाभ मिळवून देण्याचे योग गुरु योगेंद्रजी यांचे ध्येय साकार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही मा हंसा म्हणाल्या.
मेडिटेशन अॅप, निस्पंद, सादर
आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सादर केलेल्या ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या ‘निस्पंद मेडिटेशन अॅप’मुळे ध्यानसाधकांना व विद्यार्थ्यांना अद्वितीय असे ज्ञान व सहाय्य मिळते. यामध्ये प्रत्येक प्रसंगासाठी खास असे ध्यानसाधनेचे मार्गदर्शन करणाऱ्या व्हिडिओंची लायब्ररी आहे. हे अॅप अॅंड्रॉईड, आयओएस व इंटरनेटवर उपलब्ध आहे.
आरोग्यसेवेबद्दल डॉक्टरांची चर्चा
या प्रसंगी, ‘आगामी दशकातील भारतामधील आरोग्यसेवेपुढील आव्हाने’ या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. या पथकामध्ये डॉ. हरिष शेट्टी (सायकिअॅट्रिस्ट), डॉ. शशांक जोशी (एन्डोक्रिनॉलॉजिस्ट, डायबिटॉलॉजिस्ट), डॉ. रविंद्र चित्तल (पेडिएट्रिशिअन, निओनॅटोलॉजिस्ट), डॉ. प्रद्युम्न मामतोरा (ऑर्थोपेडिक सर्जन) आणि डॉ. शेखर आंबर्डेकर (कार्डिओलॉजिस्ट) यांचा समावेश होता. त्यांच्या ज्ञानसंपन्न चर्चेचे सूत्रसंचालन डॉ. मिकी मेहता (जागतिक आघाडीचे समग्र आरोग्य गुरु) यांनी केले.
