तंत्रज्ञानातील स्वातंत्र्य अटलजींमुळे मिळाले- डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे : विज्ञान, तंत्रज्ञानावर अटजींलींची श्रद्धा होती. जय जवान, जय किसानबरोबरच जय विज्ञानाचाही मंत्र त्यांनी दिला. सीएसआयआरच्या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय अटलजींनाच जाते. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली. तंत्रज्ञानातील परिवर्तनात भवितव्य आहे यावर त्यांचा विश्वास होता. तंत्रज्ञानातील स्वातंत्र्य अटलजींमुळे मिळाले, असे गौरवोद्गार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना आज (दि. 25 डिसेंबर 2020) राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. माशेलकर बोलत होते. पुणेरी पगडी, मानपत्र, एक लाख रुपयांचा गौरवनिधी असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी वैशाली माशेलकर, कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, महापौर मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी व्यासपीठावर होते.
या वेळी डॉ. माशेलकर यांनी अटलजी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देताना त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मला आयुष्यात अनेक सन्मान मिळाले, पण युगपुरुषाच्या नावाने मिळालेला अटल संस्कृती गौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च आहे. त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. त्यांची दूरदृष्टी, मार्गदर्शन, माझ्यावर असलेला विश्वास, मला दिलेले स्वातंत्र्य आणि पाठीवर असलेला हात यामुळे मला कार्याची प्रेरणा मिळाली. मोठे बदल घडविताना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी राजकीय पाठींबा लागतो, तो मला सतत अटलजींकडून मिळाला. पोखरण अणुचाचणीनंतर अनेक देशांनी आपल्यावर निर्बंध लादले. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न अटलींनी केला असता त्यावेळी आपण आपल्या मेंदूला निर्बंध घालत नाही, तो पर्यंत कुठच्याही निर्बंधाला घाबरायचे नाही, असे मी त्यांना सांगितल्याचे डॉ. माशेलकर म्हणाले. संपूर्ण भारतीय बनावटीचे हंसा-3 हे एअरक्राफ्ट, पोखरण-2 अणुचाचणी आणि त्रिशूल या क्षेपणास्त्राची चाचणी यातून त्यांची निर्णय घेण्याची पद्धत दिसून येते.
शिक्षकांना प्रतिष्ठा दिली नाही तर देश कसा घडविणार याविषयी अटलजींना चिंता असायची. शिक्षणाविषयीच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर भर देण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे अटलजींचे हे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे डॉ. माशेलकर म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजी म्हणजे भारत देशाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. त्यांनी देशाला स्वाभीमानी देश म्हणून प्रस्थापित केले. कवी मन, साहित्यिक, संवेदनशील व्यक्ती अशी त्यांची विविध रूपे बघायला मिळत असतानाच अतिशय कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यात होती. एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसर्या कर्मयोग्याला दिला जात आहे. अणुचाचणीनंतर भारतावर अनेक देशांनी निर्बंध घातले होते. पण हे दबाव झुगारून देश मार्गक्रमण करीत राहिला. त्यावेळी इतर देशांनीही आपल्या भवितव्याचा विचार करून भारतावर लादलेले निर्बंध मागे घेतले. ज्ञानवंतांना त्यांच्या ज्ञानाचे पेटंट मिळण्यासाठी डॉ. माशेलकर यांनी केलेल्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. भारतीय लोकसंख्येची ओळखलेली क्षमता, याचा उपयोग करून घेणारे डॉ. माशेलकर वेगळे रसायन असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील युवा शक्तीला डॉ. माशेलकर यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. स्टार्टअपच्या माध्यमातून नोकरी देणारा महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही त्याचा फायदा झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, माशेलकर म्हणजे कर्तृत्व आणि नम्रता यांचा अनोखा मिलाफ आहे. पेटंटच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पेटंटविषयीचे नियम बदलावे लागले आहेत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. खासदार गिरीश बापट यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस कार्यक्रमाचे आयोजक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविकात पुरस्काराविषयीची भूमिका विषद केली. उपस्थितांचे स्वागत मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, सुनील महाजन यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. भार्गवी चिरमुले आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघ यांचा या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहोळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत नया गाता हूँ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम झाला. संवाद पुणे निर्मित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्यरचना सादर केल्या. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते.
