Thursday, September 3, 2026
PUNE

गव्हाच्या शेकडो दाण्यांनी साकारले ‘अटल’जीं चे भव्य रेखाचित्र

पुणे : गव्हाचे शेकडो दाणे, काळा मसाला, मीठ, साबुदाणा वापरुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारण्यात आले. विविध पद्धतींनी भारतभर अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. मात्र, पुण्यामध्ये ९६ किलो गहू वापरुन केलेल्या रेखाचित्राच्या माध्यमातून अटलजींचे स्मरण करण्यात आले. तसेच चित्रयज्ञाच्या माध्यमातून सलग १२ तास लहानांपासून मोठयांपर्यंत अनेकांनी विविध चित्रे देखील साकारली. 
निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ९६ किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारण्यात आले. यावेळी निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, अ‍ॅड.वैजनाथ विंचूरकर, रामलिंग शिवणगे, अशोक कुलकर्णी, शुभदा जोशी, विद्या शाळीग्राम, हेमंत पानकर, कलातीर्थचे अमोल काळे, महेश कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, स्वामिनी कुलकर्णी, अनुश्री काळे आदी उपस्थित होते. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले. 
उदय जोशी म्हणाले, सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे वर्षातून ८ ते १० कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम केले जातात. आदिवासी भागातील गरजूंपासून ते रिक्षाचालकांपर्यंत सर्वांना मदतीचा हात दिला जातो. यंदा अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र रेखाटून १०० किलो गहू वंचित विकास संस्थेला देण्यात आला. 
अमोल काळे म्हणाले, गव्हांच्या सहाय्याने केलेले हे चित्र रेखाटण्याकरीता सुमारे साडे तीन तासांचा कालावधी लागला. ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच चित्रांच्या माध्यमातून देखील अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. ती चित्रे भारतीय जवानांना सैनिक मित्र परिवारातर्फे पाठविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सांगता सैनिक परिवारांतील सदस्यांच्या हस्ते दीपोत्सवाने करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading