भगवद््गीतेमध्ये सामावला आपल्या सर्व उपनिषदांचा अर्क -प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी
पुणे : श्रीमद् भगवद््गीता हे अत्यंत मोलाचे असे अध्यात्मशास्त्र आहे. अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सामान्यांना सांगितले, ते या ग्रंथामध्ये आहे. सर्वसामान्य माणसाला जीवनात कसे जगावे यापासून ते स्वत:ला कसे ओळखावे, यापर्यंत सर्व स्तरांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर जाऊन श्रीकृष्णांनी उपदेश केलेला आहे. त्यामुळेच सर्व उपनिषदांचा अर्क भगवद््गीतेत सामावलेला आहे, असे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी यांनी सांगितले.
कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित श्री दत्तजयंती उत्सव २०२० चा प्रारंभ मंदिरामध्ये झाला. मोक्षदा एकादशी व गीताजयंतीनिमित्त विश्वास कुलकर्णी यांचे कीर्तन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अॅड.एन.डी.पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. कीर्तनाला शाहीर होनराज मावळे (हार्मोनियम), मुकुंद कोंडे (तबला) यांनी साथसंगत केली. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे.
ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी म्हणाले, वास्तविकपणे प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे कर्म केली जातात. मात्र, अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीव आहे. तो या कर्मांचा स्वत:ला कर्ता समजतो. हा अहंकार त्याला झालेला असतो, प्रत्यक्षात तसे नसते. ती कर्म प्रकृतीच्या गुणांद्वारे झालेली असतात. त्यामुळे स्वत:कडे कर्तव्य घेऊन अहंकार बाळगू नये, असे भगद््गीता सांगते. सर्व संत अहंकारापासून दूर रहायला सांगतात. ज्याला अहंकार असले त्याला ज्ञानरुपी अन्न जिरणार नाही. जोपर्यंत मनात अहंकार आहे, तोपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नाही. अहंकार पूर्णपणे विरल्याशिवाय आत्मज्ञान मिळणार नाही, ही शिकवण दत्तगुरुंसह सर्वच सद््गुरुंनी दिली आहे.
अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, यावर्षी देखील उत्सवात आॅलनाईन पद्धतीने सामाजिक भान राखत यंदा १५ देशांतून एकत्रितपणे शेकडो दत्तभक्त सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुहिक पठण करणार आहेत. दत्तमंदिरात रविवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे. ग्लोबल स्ट्रिमिंग सिस्टीमद्वारे एकाचवेळी देशांतर्गत तसेच परदेशातही होणार आहे. यंदाचे सर्व कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहेत. ट्रस्टच्या कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे – https://www.facebook.com/107521001159281 या फेसबुक पेजवरुन भाविकांना सर्व कार्यक्रम घरबसल्या पाहता येणार आहेत. तरी भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
