Saturday, May 30, 2026
BusinessPUNE

नवीन बांधकाम नियमावलीबाबत इतर राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा – विक्रम कुमार

पुणे, दि. २१ – “शहर व ग्रामीण भागात होणाऱ्या बांधकामांसंदर्भातील सर्व बाजूंचा विचार करून ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून देशातील इतर राज्यांनी यासाठी महाराष्ट्राचा आदर्श ठेवावा,” असे मत आयुक्त पुणे महापालिकेचे विक्रम कुमार यांनी व्यक्त केले.

नियमावलीच्या पुणे विभागाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी क्रेडाई- पुणे मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व शहरी तसेच ग्रामीण भागांसाठी (मुंबई, एम. आई. डी. सी., हिल स्टेशन इ. क्षेत्रे वगळता) एकसमान अशा “एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली” (Unified Development Control and Promotion Regulations) ला दि. २ डिसेंबर २०२० रोजी मंजूरी दिली. सदर नियमावलीद्वारे आता राज्यात सर्व ठिकाणी एकसमान नगरविकास नियम लागू झाले आहेत. ह्या नियमावलीद्वारे शासनाने विहित केलेली धोरणे व नियम सामान्य नागरिकांना लाभ मिळण्यासाठी बनवली गेली आणि तेवढ्याच प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होण्याकरिता विभागीय नगर रचना कार्यालया मार्फत राज्यभरातील नगर रचना, महानगर पालिका, नगर पालिका, सिडको, म्हाडा आदी विभागातील अधिकाऱ्यांना सर्वंकष प्रशिक्षण देण्यासाठी कार्येक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यापूर्वी ‘क्रेडाई’च्या पुढाकाराने ठाणे व नागपूर विभागाकडूनही प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असून पुण्यानंतर औरंगाबाद, व नाशिक येथेदेखील हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भा. प्र. से. महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पी. एम. आर. डी. ए.) सुहास दिवसे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे येथील नगर विकास विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या प्रसंगी ‘युनिफाईड डीसीपीआर’ (Unified DCPR) तयार करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या संचालक सुधाकर नांगनुरे, वक्ते प्रकाश भुक्ते, अविनाश पाटील, सुनील मरळे, संजय सावजी या अधिकाऱ्यांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचे क्रेडाई-पुणे मेट्रो चे अध्यक्ष सुहास मर्चंट, महासंचालक डी. के. अभ्यंकर, रणजीत नाईकनवरे, किशोर पाटे, अमर मांजरेकर, सचिव आदित्य जावडेकर, खजिनदार आय. पी. इनामदार यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विक्रम कुमार म्हणाले, “ या नियमावलीमुळे देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी “इज ऑफ डुईंग बिझनेस” ही संकल्पना साध्य होणार आहे. राज्यभरातील सर्व बांधकाम व्यावसाईक, आर्किटेक्ट, बांधकाम सल्लागार पर्यायाने सर्वसामान्यांनाही या सुलभ नियमावलीचा मोठा फायदा होणार आहे.”

हर्डीकर म्हणाले, “सर्व नियमावलींचा उद्देश हा जीवनमान सुधारणे असाच असल्याने ही नियमावलीदेखील प्रत्यक्षात आणताना त्याचा विचार व्हायला हवा. शिवाय यात सर्वसामान्यांचा विचार झाला असून त्यांना पूरक अशी नियमावली असल्याचा आनंद आहे.”

दिवसे म्हणाले, “बांधकाम व्यवसाय अर्थविश्वाला चालना देणारा व्यवसाय आहे. यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीही होते. त्यामुळे अशी सर्वसमावेशक नियमावली आल्याने आमची निर्णय प्रक्रिया सोपी होते. हे नियम केवळ पुस्तकातच न राहता त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्याची अंमलबजावणी यंत्रणा प्रथम सक्षम करणे आवश्यक आहे. म्हणूनच अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम थोड्या थोड्या कालावधीने सतत होत राहणे आवश्यक आहे.”

मर्चंट म्हणाले, “एफएसआयचा गैरवापर रोखण्यासाठी पी-लाइन आणि सहायक एफएसआयसारख्या तरतुदी यात केलेल्या असल्याने नगररचना विभागामार्फत राज्यातील रिअल इस्टेटच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. परंतु आम्ही सेव्हिंग क्लॉजच्या स्पष्टीकरणासाठी उपाययोजना राबविण्यास, डीसीपीआरमध्ये पीएमआरडीएचा समावेश करणे, समावेशक गृहनिर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुगम करणे आणि झोपडपट्टी टीडीआरची उपलब्धता ठरविण्याची विनंतीही विभागाला करत आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading