नव्याने सुरू झालेल्या ‘बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेज’साठी ‘बँक ऑफ बडोदा’चा संरक्षण दलांशी सामंजस्य करार
नवी दिल्ली – भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ‘बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेज’च्या माध्यमातून भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दल यांना विशेष सानुकूलित बँकिंग सुविधा देण्याबाबत एका सामंजस्य करारावर (एमओयू) आज स्वाक्षरी केली, तसेच भारतीय लष्कराबरोबर असलेल्या विद्यमान सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले. बँकेने भारतीय हवाई दलाबरोबरही अशीच व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चारही सशस्त्र दलांसोबत बॅंकेची वेतनविषयक व्यवस्था झालेली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठीही बॅकेने असेच पॅकेज सादर केले आहे.
‘बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेज’अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलातील सेवा बजावणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या जवानांना बँकेच्या 8200 हून अधिक देशांतर्गत शाखा व 20 हजारांहून अधिक ‘टच पॉईंट्स’ या नेटवर्कद्वारे सेवा पुरविण्यात येतील. या पॅकेजमध्ये विनामूल्य वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण, कायमस्वरुपी अपंगत्व संरक्षण, अंशतः अपंगत्व संरक्षण, हवाई अपघात विम्याचे मोठ्या रकमेचे संरक्षण, तसेच सेवा बजावणाऱ्या कर्मचार्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर मुलांसाठी उच्च शिक्षणासाठीची तरतूद व मुलींसाठी विवाह खर्चाची तरतूद अशा आकर्षक लाभांचा समावेश आहे.
या पॅकेजमध्ये इतरही काही सुविधा देण्यात आल्या आहेत. इतर सर्व बँकांच्या ‘एटीएम’मध्ये अमर्यादित व नि:शुल्क एटीएम व्यवहार, किरकोळ कर्जांवरील विविध सेवा शुल्कात माफी वा सवलत, ‘आरटीजीएस’ / ‘एनईएफटी’मार्फत पैसे पाठवण्याची मोफत सुविधा, मोफत डिमांड ड्राफ्ट / बँकर चेक, लॉकर भाड्यात मोठी सवलत, ‘डिमॅट’ खात्यावरील मेन्टेनन्स शुल्कावर माफी आणि डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड वापरातील विविध अतिरिक्त फायदे अशा सुविधांचा यात समावेश आहे.
यावेळी बोलताना बँकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंग खिची म्हणाले, “बँक ऑफ बडोदाचे सशस्त्र दलांशी सहकार्य झाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. भारतीय सशस्त्र दलांतील सेवेत कार्यरत असणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना बँकिंगचा उत्कृष्ट अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेज’ अंतर्गत असणाऱी अंगभूत वैशिष्ट्ये व सुविधा यांमुळे, बँकिंग उद्योगात उपलब्ध असलेल्या वेतन व निवृत्तीवेतन योजनांमध्ये हे पॅकेज सर्वोत्तम ठरते.
‘बँक ऑफ बडोदा’च्या वतीने कार्यकरी संचालक विक्रमादित्य सिंह खिची आणि भारतीय लष्कराच्या वतीने लेफ्टनंट जनरल रवीन खोसला, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, डीजी (एमपी व पीएस) यांनी; तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या वतीने उप महानिरीक्षक डी. एस. सैनी, टीएम, प्रधान संचालक (प्रशासन) यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता, एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम, अॅडजटंट जनरल हे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी भारतीय हवाईदलालाही ‘बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेज’ बहाल करण्यात आले.
बँक ऑफ बडोदा व भारतीय नौदल यांच्यातील करारावर बॅंकेच्या वतीने बॅंकेचे सरव्यवस्थापक (सरकारी संबंध व सार्वजनिक उद्योग) अश्विनी कुमार आणि नौदलाच्या वतीने कमोडोर नीरज मल्होत्रा, कमोडोर (पी अँड ए) यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी बँकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खिची व रियर अॅडमिरल गिरीश के. गर्ग, एसीओपी (एसी) हे उपस्थित होते.
