Saturday, October 24, 2026
ENTERTAINMENT

भूषण, रिया, सायली झाले ‘मनमौजी’

लॉकडाऊनच्या काळात इतर विषयांची चर्चा होत असतानाच आणखीन एक चर्चेचा विषय बनला होता. तो म्हणजे ‘मनमौजी’ चित्रपटाचा. जेव्हापासून गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची सोशल मीडियावर अधिकृत घोषणा केली तेव्हापासूनच खरंतर या चर्चेला उधाण आले होते. यापूर्वी गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने ‘गुलाबजाम’, ‘लॉस्ट अँड फाउंड’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली असल्याने ‘मनमौजी’मध्येही काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री आहे. त्यात चित्रपटातील स्टारकास्ट विषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता यावरूनही पडदा उठला आहे.

‘मनमौजी’मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ‘हँडसम हंक’ भूषण पाटील, रॅम्पवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवणारी, शास्त्रीय नृत्यांगना, अभिनेत्री रिया नलावडे आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सर्वांनीच आपल्या अप्रतिम अभिनयाने स्वत:ची एक छबी निर्माण केली आहे. एकंदरच हा एक रोमँटिक सिनेमा असल्याचे कळतेय.

प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाचे निर्माता विनोद मलगेवार असून चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन शितल शेट्टी यांनी केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांच्या गाण्यांना अमितराज यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाच्या डिओपीची धुरा प्रसाद भेंडे यांनी सांभाळली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना काहीतरी चांगले आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार हे नक्की ! गोल्डन गेट मोशन पिक्चर्स ‘मनमौजी’ सोबतच प्रेक्षकांसाठी येत्या आगामी वर्षांत चित्रपटांचा धमाका घेऊन येणार आहे. त्यापैकीच एक चित्रपट ‘फौजदार’. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटाचे टिझर पोस्टर झळकले होते. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading