पुण्याच्या पवन सिंह यांची आयएसएसएफच्या पंच समितीमध्ये सलग दुसर्यांदा निवड
पुणे, दि. 14 – भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआय) सह – महासचिव, देशाच्या नेमबाजी संघाचे माजी प्रशिक्षक आणि गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन, गन फॉर ग्लोरी शुटींग अकादमीचे संस्थापक संचालक असलेल्या पवन सिंह यांची इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएसएफ) पंच समितीमध्ये सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
कोरोनामुळे आयएसएसएफच्या प्रशासक परिषदेने पहिल्यांदाच ऑनलाईन निवडणूक घेतली असून यात पवन सिंह यांना ७५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. ही निवडणूक दर दोन वर्षांनी घेण्यात येते. या ७ सदसीय पंच समितीमध्ये निवडीसाठी जगभरातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात पवन सिंह यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली हे विशेष. या महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान मिळविलेले सिंह हे पहिले भारतीय आहेत. तसेच येत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जुरी मेंबर म्हणुन काम पहाणारे देखील ते पहिलेच भारतीय ठरतील.
याविषयी भावना व्यक्त करत ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय नेमबाजी समुदाय, विशेषतः आयएसएसएफच्या प्रशासक परिषदेने माझ्यावर विश्वास ठेवत, मागच्या कार्यकाळात मी घेतलेल्या परिश्रमांना लक्षात घेत माझी निवड केली याचा मला खूप आनंद होत आहे. यात मला वेळोवेळी एनआरएआयचे अध्यक्ष व आयएसएसएफचे उपाध्यक्ष रनिंदर सिंह यांचे मार्गदर्शन मिळाले, यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”
इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने गठीत करण्यात आलेली ही पंच समिती एक अध्यक्ष व ७ सदस्यांची असून जागतिक पातळीवरील नेमबाजीचे एक समान नियम, आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचांना लागू होणारे नियम व मार्गदर्शक तत्त्वे, अभ्यासक्रम याबरोबरच पंचांना आवश्यक असलेल्या परवान्यांचे अर्ज आदि गोष्टींवर मुख्यतः नियंत्रण ठेवते. याबरोबर किमान एकदा भेटत फेडरेशनच्या प्रशासकीय परिषदेला अहवालदेखील सादर करते.
