Sunday, May 31, 2026
PUNE

‘लक्ष्या’च्या अभिनयाला पुणेकरांनी दिलेली दाद अविस्मरणीय -अभिनेत्री प्रिया बेर्डे

पुणे : “पुण्याशी माझे नाते खूप जुने आहे. माझे पती लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते ‘लक्ष्या’ यांच्या चित्रपटांना व नाटकांना पुणेकर रसिकांनी दिलेली दाद अविस्मरणीय आहे. कलाप्रेमींच्या या शहराने अनेक दिग्गज कलाकार घडवले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी केले.
बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या बावधन येथील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अभिनेता अभिनय बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे सदस्य, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागातर्फे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनाही गौरविण्यात आले.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, “माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुण्यातील महाविद्यालयात झाले आहे. सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर कला क्षेत्रातील विद्यार्थी, तरुण आणि नवोदित कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणार आहे. कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सुर्यदत्ता’मध्ये शिक्षणासोबत कला व क्रीडा गुणांना वाव दिला जातो, याचा आनंद आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विविध अभ्यासक्रमाची, तसेच उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “हा गौरव सुर्यदत्ता संस्थेतील प्रत्येकाचा आहे. विद्यार्थ्यांना सतत नवीन काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असतात. कला क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम आमच्याकडे आहेत. परफॉर्मिंग आर्ट्स, बीसीएस ऍनिमेशन हे अभ्यासक्रम असून, गेल्या वर्षी सूर्यदत्ता प्रोडक्शन्स सुरु केले आहे. तरुणांना अभिनयाचे धडे देण्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले जाते. यामध्ये आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.”

माझ्या पहिल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. असेच माझ्या पुढच्या कामांना देखील साथ द्यावी, अशी भावना अभिनय बेर्डे याने व्यक्त केली. डॉ. सुनील धनगर यांनी सुत्रसंचलन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading